दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे छत्रपतींनी दाखवून दिले आणि आता दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. यावेळी अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला.

“आकाश गंगेचा तळ सापडत नाही त्याप्रमाणे शरद पवार यांच्या कामाचा तळ सापडत नाही. ८० व्या वर्षात नव्या पिढीला उभं करण्याचे काम फक्त शरप पवार करत आहेत. शरद पवार यांनी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याची नोंद होईल. इतिहास पुरुष म्हणून आम्ही त्यांची ओळख सांगतो,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

“देशातील सामान्य लोकांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. म्हणूनच आमचं दातृत्व, मातृत्व शरद पवार आहेत,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. “शून्यातून जग कसं निर्माण करायचं ही किमया शरद पवार यांनी करुन दाखवली. कोणतीही परिस्थिती बदलू शकते हाच आदर्श आमच्यासमोर आहे. त्यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवणार आहोत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.