सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवानांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केले. औरंगाबाद येथील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. तर पिंपरी येथील आंबेडकर चौकात भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

औरंगाबादच्या क्रांती चौकात मोहन भागवत यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. तर भागवतांनी सैनिकांची जाहीर माफी मागावी किंवा जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी पिंपरीत करण्यात आली. सीमेवर जाऊन भागवत सैनिकांसोबत फोटो काढतात आणि इथे मात्र त्यांच्या विरोधात बोलतात त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असेही राष्ट्रवादी आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्य दलातील जवानांपेक्षा स्वयंसेवक लवकर तयार होऊ शकतात. देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची गरज पडल्यास तसेच आम्चया संविधानाने आणि कायद्याने परवानगी दिली तर आम्ही तातडीने शत्रूशी लढायला तयार आहोत. सैन्याला तयारीसाठी ६ ते ७ महिने लागतील आम्ही दोन दिवसात तयार होऊ शकतो कारण आमची शिस्तच तशीच आहे असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. मुझफ्फरपूर येथे संघाच्या शिबीरात त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता मोहन भागवत यांचा निषेध करण्यात येतो आहे. मोहन भागवत यांनी सैनिकांची माफी मागितली नाही तर राज्यभरात आंदोलन करू असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.