अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील व्यक्तींसाठी महिनाकाठी सुमारे १२ हजार मेट्रिक टन धान्य लागते. अन्नसुरक्षा योजनेनुसार सव्वादोन महिन्यांचे धान्य प्रत्येक जिल्ह्य़ाने साठवून ठेवणे अपेक्षित आहे. हे करताना जिल्हापुरवठा विभागाची कसरत होत असून नवीन गोदाम बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आराखडे मागवण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्य़ात तालुका आणि मोठय़ा गावांच्या स्तरावर एकूण ३७ गोदामे आहेत. पैकी ११ गोदामांची पुरती पडझड झाली असून ते वापरायोग्य राहिलेले नाहीत. २६ चांगली गोदामे आहेत; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसा धान्यसाठा ठेवण्यात ते अपुरे पडतात. गतवर्षी १८ नवीन गोदामे बांधण्यात आली. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे सध्या ४४ गोदामांमध्ये धान्य साठवणे शक्य होते आहे. तरीही जिल्ह्य़ाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने आणि लोकसंख्या अधिक असल्याने आणखी गोदामांची आवश्यकता आहे.
जिल्ह्य़ात अंत्योदय योजनेचे ७८ हजार १७३ लाभार्थी असून ३ लाख ३७ हजार ३०५ प्राधान्य कुटुंब आहेत. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रती कार्डामागे ३५ किलोग्रॅम धान्य पुरवण्यात येते; परंतु प्राधान्य कुटुंबात प्रती व्यक्तीमागे धान्य पुरवण्याचा नियम आहे. एका व्यक्तीला ५ किलोग्रॅम धान्य देण्यात येते. यानुसार प्राधान्य कुटुंबात १९ लाख २० हजार ८६५ व्यक्ती आहेत. अशा सुमारे २० लाख लोकांसाठी प्रतिमाह गहू व तांदूळ मिळून १२ हजार ३४१ मेट्रिक टन धान्याची आवश्यकता भासते. दरम्यान, सव्वादोन महिन्यांचे धान्य साठवावे, असे संकेत असल्याने एकावेळी जवळपास ३० हजार मेट्रिक टन धान्य साठवण्याची तजवीज करावी लागणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाने २३ नवीन गोदामे बांधकामाचा प्रस्ताव गतवर्षी शासनाकडे सादर केला होता; परंतु एका जिल्ह्य़ाला एकदाच एवढय़ा मोठय़ा संख्येने गोदामे मंजूर करणे शक्य नसल्याने प्राधान्यक्रम ठरवून देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार भोकर, देगलूर, धर्माबाद, नायगाव, नांदेड आणि उमरी येथे प्रत्येकी एक गोदाम कंधारमधील कंधार, बारुळ व कुरुळा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, लोहा तालुक्यात मारतळा येथे एकतर मुखेडमध्ये मुखेड व मुक्रमाबाद येथे प्रत्येकी एक गोदाम बांधण्यात येणार आहे. अशा एकूण १२ नवीन गोदामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली.