दलित व अन्य मागासवर्गीयांपैकी मूठभरांनीच विविध योजनांचा लाभ घेतला. सोयी व सवलती सर्वत्र झिरपल्या नाहीत. ६७ वर्षांत शासन मागासवर्गीयांना आरक्षणमुक्त करू शकले नाही. त्यामुळे या योजनांचे मूल्यमापन करणे प्रासंगिक ठरते, असे परखड मत संशोधक डॉ.नितीन तागडे यांनी व्यक्त केले. 

दिल्लीच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ दलित स्टडीज’ या संस्थेतील डॉ. तागडे यांनी नारायणराव काळे स्मृती महाविद्यालयात अर्थशास्त्रावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात आपली मते ठामपणे व्यक्त केली. मागासवर्गीय जातीच्या विकासासंबंधी धोरण, योजना व फ लश्रुती या विषयावर तीन सत्रांत चर्चा झाली. पहिल्या सत्रात बोलतांना डॉ.नितीन तागडे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीस ६७ वर्ष लोटूनही एससी, एसटी व ओबीसी वर्गातील लोकांना आर्थिक समानता लाभली नाही, हे देशभरातील आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दहा वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. पुढे स्वत:हून प्रयत्न होतील. मागासवर्गीयांचा जीवनस्तर उंचावेल. ते आर्थिक व सामाजिक विषमतेतून बाहेर पडतील, अशी त्यांची अपेक्षा होती, पण ती विफ ल ठरली. अद्याप सामाजिक व आर्थिक विषमता असल्याने घटनेने दिलेले कवच दूर करणे योग्य ठरणार नाही. उलट, असे कवच लाभावे म्हणून आता अन्य समाजही प्रयत्नशील झाले आहेत. आरक्षणाच्याच माध्यमातून विषमता दूर करण्याचे शासनस्तरावरील प्रयत्न पुरेसे नाही. मागास व दुर्बल घटकांना विकासाचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी विशेष तरतुदींची गरज आहे. प्रचलित योजनांचे मूल्यमापन करून त्या कार्यकुशलतेने अंमलात आणाव्या. वंचित घटकांपर्यंत शासकीय यंत्रणेने पोहोचावे. अकार्यक्षम धोरणाने काही योजना थंडबस्त्यात पडतात. निधी परत जातो म्हणून अंमलबजावणीचे सूत्र बदलावे, अशी अपेक्षा डॉ.तागडे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य संदीप काळे, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे व प्राचार्य डॉ. संजय धनवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्राच्या दुसऱ्या भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्नेहा देशपांडे यांनी ग्रामीण विकास योजनांवर आधुनिकीकरणाचा पडलेला प्रभाव, महात्मा फु लेंची आरक्षणाबाबत दृष्टी, भूधारण या विषयावर विचार मांडले. तसेच डॉ. आर. जी. टाले, डॉ. सुनील शिंदे, डॉ.गौतम कांबळे, डॉ. जे. एम. काकडे, डॉ. किशोर साबळे, डॉ. प्रशांत काटोले व अन्य विभागातून आलेल्या तज्ज्ञांनी मते मांडली.
समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. मिलिंद पाटील व डॉ. धनवटे यांची उपस्थिती होती. चर्चासत्राचे सूत्र प्रा. महेंद्र गावंडे, डॉ. सुनील पखाले, डॉ. गणेश मोहोड, डॉ. उल्हास राठोड व शुभांगी नासरे यांनी सांभाळले.