News Flash

दुर्लक्षामुळे विदर्भातील पर्यटनस्थळे विकासाविना

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रात नसतील एवढी पर्यटनस्थळे विदर्भात आहेत. प्राचीन गुंफा, मंदिरे, तलाव, गडकिल्ले या सर्वानी परिपूर्ण विदर्भात पर्यटनाला चालना

| September 27, 2014 04:02 am

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रात नसतील एवढी पर्यटनस्थळे विदर्भात आहेत. प्राचीन गुंफा, मंदिरे, तलाव, गडकिल्ले या सर्वानी परिपूर्ण विदर्भात पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व काही असताना केवळ दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळांचा विकास होऊ शकलेला नाही. विदर्भातील या पर्यटनस्थळांवर सरकारची मेहरनजर पडली तर येथील पर्यटनाचा विकास होऊन मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होऊ शकते.
सुमारे एक कोटीच्या पर्यटन व्यवसायात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या व्यवसायात केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत बी. व्ही. गोपाल रेड्डी यांच्या कार्यकाळात पर्यटन कसे विकसित करायचे, याविषयीचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, कागदावर मांडण्यात आलेला हा आराखडा कागदावरच खेळत राहिला. बी.व्ही. गोपाल रेड्डी यांच्यानंतर आलेल्या एकाही अधिकाऱ्याने हा आराखडा अंमलात आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली नाहीत. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या पर्यटनविकास समित्या आहेत, पण त्या समित्याही मृत पावल्या आहेत. या समित्या पुनरुज्जीवित झाल्या तर एक कोटीच्या पर्यटन व्यवसायात सर्वाधिक वाटा विदर्भाचा राहील. विदर्भातील पर्यटनाचे सर्वात मोठे आकर्षण जंगल आणि वन्यजीव आहे. तत्कालीन केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ‘गेट वे टू टायगर कंट्री’ची घोषणा करून पर्यटन व्यवसायाचे मोठे स्वप्न विदर्भाला दाखवले. हे स्वप्न पुढे नेण्यात मात्र विदर्भातील राज्यकर्ते कमी पडले, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही.
व्याघ्र प्रकल्पाला लागूनच अनेक पर्यटनस्थळे विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून रामटेक आणि खिंडसी, तसेच अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागूनच चिखलदरा, सेमाडोह यासारखी ठिकाणे आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच गडचिरोली जिल्ह्य़ातील मरकडा देवस्थान, चंद्रपूरचे महाकाली मंदिर, आमटे आणि बंग यांचे प्रकल्प आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून काही पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचे पॅकेज तयार केले, तर रोजगारासोबतच त्या पर्यटनस्थळांचाही विकास होऊ शकेल. शहर पर्यटनासाठीसुद्धा नागपुरात बराच वाव आहे. मुंबई, गोवा आदी शहरातील आणि आसपासची पर्यटनस्थळे पर्यटकांना दाखविण्यासाठी शहर बसची सुविधा आहे. नागपूर शहर आणि आसपाससुद्धा अशी प्रचंड पर्यटनस्थळे आहेत. त्या पर्यटनस्थळांसाठी शहर बस सुरू केल्यास त्यांचा विकास होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेने असा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, त्याचे काय झाले, हे कुणालाही ठावूक नाही. पर्यटनस्थळांविषयीची उदासीनता पर्यटनस्थळांच्या विकासाला आणि पर्यायाने रोजगार व कोटय़वधींच्या व्यवसायालाही मारक ठरत आहे.
*रामटेकजवळ मनसरनजीकच्या वाकाटककालीन राजधानी प्रवरपुरात उत्खननानंतर सापडलेले प्राचीन अवशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 4:02 am

Web Title: negligence to vidarbha tourism
Next Stories
1 सांगलीत आघाडीतील समीकरणे बिघडली
2 भाजपत इच्छुकांची धांदल
3 आघाडी तोडण्याचे पाप काँग्रेसचेच- आर. आर.
Just Now!
X