रत्नागिरी : धरणफुटीने गेल्या जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला मोठा फटका बसला. या धरणफुटीत एक अख्खी वाडी नामशेष झाली आणि २२ जण प्राणांना मुकले. भवताल पाण्यात बुडाला आणि जगण्याचा प्रवाह अडला, तरी अशा नकारात्मक परिस्थितीत जगण्याची उमेद टिकवली ती ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या शाळेने. या भीषण संकटात गावकऱ्यांच्या मानसिक आधारात मोठी भूमिका बजावणाऱ्या या शाळेला आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी समाजाच्या आधाराची गरज आहे!

राज्याच्या विविध भागांना यंदा महापुराचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे जीवितहानीबरोबरच वित्तहानीही मोठय़ा प्रमाणात झाली. कोकणातही या निसर्गाचा प्रकोप अनुभवायला मिळाला. तिवरेच्या धरणफुटीने नागरिकांचे मनच उद्ध्वस्त झाले, पण त्यातून सावरत पुन्हा नव्याने उभारी धरण्यासाठी गावातील मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवित असलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या शाळेचा सहभाग मोठा होता. गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था संचालित ही शाळा परिसरातली ही नामांकित शाळा धरणफुटीच्या संकटात गावाच्या पाठिशी ठामपणे उभी होती.

या शाळेचे गावकऱ्यांच्या जीवनातले स्थान महत्त्वाचे असले तरी या शाळेची ताकद मर्यादित आहे. शाळेत आठवी ते दहावीचे प्रत्येकी एक वर्ग असून ९३ विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त म्हणजे ५१ आहे. त्याचबरोबर एकूण विद्यार्थ्यांपैकी इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५७ आहे. तिवरे गावाच्या भवताली असलेल्या येडगे-धनगरवाडी, फणसवाडी, कुंभारवाडी, मोरेवाडी इत्यादी ठिकाणची मुले दररोज तीन ते चार किलोमीटरची पायपीट करीत शाळेत येतात. यापैकी धनगरवाडीतली सहा-सात मुलांना तरसुमारे पाच ते सात किलोमीटर अंतर चालावे लागते.

या सगळ्या अडथळ्यांवर मात करीत १९९९ पासून शाळेचा दहावीचा निकाल सातत्याने ९० टक्क्यांच्यावर राहिला असून गेली तीन वर्षे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १०० टक्के राहिले आहे. या व्यतिरिक्त चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, गणित अध्यापक मंडळ आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकलेची एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा, क्रीडा स्पर्धा, एनसीसी संचलन, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा इत्यादी विविध उपक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्साही आणि यशस्वी सहभागही लक्षणीय ठरला आहे.

चित्र असे आशादायक असूनही सध्याच्या युगातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी घडविण्याच्या  दृष्टीने आवश्यक  शैक्षणिक सुविधांची शाळेत वानवा आहे. त्यासाठी आवश्यक वास्तू उभारण्यासाठी शाळेकडे स्वत:ची जमीन आहे, पण निधी नाही. तो उपलब्ध झाला तर सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा संकुल, संगणक कक्ष इत्यादी सुविधा निर्माण करण्याची संस्थेची इच्छा आहे. पंचक्रोशीत कुठेच या सुविधा नसल्यामुळे शक्य झाल्यास इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ करून देण्याची शाळेची तयारी आहे. ही संस्था यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरी करीत असताना समाजातील दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्यास ही नवी झेप घेणे शक्य होईल, असा संस्थेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.