जिल्ह्यातील ९ मतदारसंघात ५१ उमेदवारांचे १०६ अर्ज अवैध ठरले. छाननीनंतर ३९९ उमेदवार िरगणात आहेत. नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक उमेदवार नशीब आजमावत आहेत.
जिल्ह्यात ४१५ उमेदवारांनी तब्बल ६७६ अर्ज दाखल केले होते. छाननीत ५१ उमेदवारांचे १०६ अर्ज अवैध ठरले. पक्षाचा एबी फॉर्म नसणे, प्रतिज्ञापत्र पूर्ण न भरणे आदी कारणांवरून अर्ज अवैध ठरले. कोणत्याही प्रमुख पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही. मतदारसंघनिहाय वैध उमेदवार : किनवट २९, हदगाव ३०, भोकर ७१, नांदेड उत्तर ७४, नांदेड दक्षिण ८५, लोहा २२, नायगाव २२, देगलूर ३५ वा मुखेड ३१.
भोकर, नांदेड उत्तर व दक्षिण मतदारसंघात उमेदवारांची संख्या मोठी असल्याने दोन दिवसात इच्छुकांपकी कोणी अर्ज मागे घेतले नाही, तर येथे मतपुस्तिका छापावी लागणार आहे. एका मतदानयंत्रात १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होऊ शकतात, अशी ३ यंत्रे ठेवता येऊ शकतात. म्हणजे ६० पेक्षा जास्त उमेदवार झाल्यास मतपुस्तिका छापण्याशिवाय पर्याय नाही. तीन मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने मतपुस्तिका छापावी लागेल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर आहे.
परभणीत १० अर्ज अवैध
वार्ताहर, परभणी
जिंतूर मतदारसंघात २, परभणी २, गंगाखेड ५ व पाथरीत एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. त्यामुळे ४ मतदारसंघात १३९ उमेदवार बाकी आहेत. अर्ज माघारीनंतर (१ ऑक्टोबर) लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
गंगाखेडमध्ये मनसेचे बालाजी मुंढे, शिवसेनेचे कालिदास कुलकर्णी, भाजपचे सुभाष कदम यांचे अर्ज ए.बी.फार्म नसल्यामुळे बाद ठरले. बाळासाहेब जोंधळे व विठ्ठल साखरे या दोघांच्या अर्जावर सूचकांच्या सह्य़ा नसल्याने अर्ज बाद झाले. आता या ठिकाणी २८ उमेदवार राहिले आहेत.
परभणीत गंगाधर जवंजाळ यांचा पक्षाचा ए. बी. फार्म नसल्याने, तर समाधान पोटभरे यांचाही अर्ज अवैध ठरला. परभणीत ५६ उमेदवार रिंगणात आहेत. जिंतूर येथे बसपचे कपिल खिल्लारे व भाजपचे अॅड. जितेंद्र घुगे यांचे ए. बी. फार्म नसल्याने अर्ज अवैध ठरले. जिंतूरमध्ये २७ उमेदवार रिंगणात आहेत. पाथरीमध्ये एकमेव गौतम ब्रह्मराक्षे यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे येथे २८ उमेदवार राहिले आहेत.
उस्मानाबादमध्ये १०८ अर्ज वैध
वार्ताहर, उस्मानाबाद
जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांत १०८ अर्ज वैध ठरले. तुळजापूर मतदारसंघांत ३१, परंडा १८, उस्मानाबाद ३५ व उमरगा २४ असे वैध उमेदवारी अर्ज आहेत.
औरंगाबाद मध्य मध्ये १३, पैठणमध्ये १६ अर्ज बाद
प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्य़ातील ९ मतदारसंघांत छाननीत २९ उमेदवारांचे ७३ अर्ज अवैध ठरले. पैठणमध्ये सर्वाधिक १६, तर त्या खालोखाल औरंगाबाद मध्य मध्ये १३ अर्ज बाद झाले. बहुतांश उमेदवारांनी शपथपत्र अपूर्ण भरले, तर काहींच्या अर्जाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडला नव्हता. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आता ५० व्यक्तींचे ७४ अर्ज वैध आहेत. ७ व्यक्तींचे ११ अर्ज अवैध ठरविण्यात आले.
औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी दिलेल्या शपथपत्रावरील मजकुरावर एक आक्षेप नोंदविण्यात आला. मात्र, आक्षेप घेणाऱ्यानेच चूक झाल्याचे मान्य केल्याने तो अर्ज नामंजूर करून फेटाळण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सांगितले. या मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने संजय केनेकर यांच्यासह अपक्षांचे अर्ज फेटाळण्यात आले. अपूर्ण शपथपत्र तसेच एका अपक्ष उमेदवारास केवळ ९ सूचक असल्याने अर्ज फेटाळण्यात आला.
८१ उमेदवार रिंगणात
तीन मतदारसंघांमध्ये ८ जणांचे अर्ज अवैध
वार्ताहर, िहगोली
जिल्ह्यातील ३ मतदारसंघांत ८ उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. िहगोलीत ४, तर वसमत व कळमनुरीत प्रत्येकी २ उमेदवारांचा यात समावेश आहे. ३ मतदारसंघांत ८१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
िहगोलीत ४० उमेदवारांनी ५९ अर्ज दाखल केले. छाननीत ४ उमेदवारांचे ८ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे या मतदारसंघात ३६ उमेदवार राहिले आहेत. अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये मनोज जैन, प्रभाकर भाकरे, राजेश भोसले, देवराव खिल्लारी यांचा समावेश आहे. कळमनुरीत अमृतराव बोथीकर यांचा अर्ज शपथपत्र जोडले नसल्याने, तर राष्ट्रवादीचे नागोराव करंडे यांच्या अर्जासोबत ए. बी. फॉर्म नसल्याने व एकाच सूचकाची सही असल्याने अवैध ठरला. कळमनुरीत २५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. वसमतमध्ये डॉ. भागवत चामले यांचा अर्ज अपूर्ण शपथपत्र, प्रशांत गायकवाड यांनी ए. बी. फॉर्म जोडला नसल्याने व एकाच सूचकाची सही असल्याने अवैध ठरला. वसमतमध्ये आता २५ अर्ज राहिले आहेत.
अर्ज मागे घेण्याची मुदत १ ऑक्टोबर आहे. किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी आपापल्या उमेदवारांच्या लाभासाठी अपक्षांचे अर्ज मागे घेण्याबाबत व्यूहरचना केल्याचे चित्र आहे.
माजी खासदार वाघमारेंसह २९ उमेदवारांचे अर्ज अवैध
वार्ताहर, लातूर
जिल्हय़ातील सहा मतदारसंघांत २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे यांचा समावेश आहे.
औसा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. औशात २१ उमेदवार आहेत. लातूर शहर मतदारसंघात डॉ. जे. एम. वाघमारे, अशोक गोिवदपूरकर यांच्यासह सहाजणांचे अर्ज अवैध ठरले. आता ४० उमेदवार येथे िरगणात आहेत. निलंगा मतदारसंघात सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. येथे १९ उमेदवार िरगणात आहेत. उदगीरमध्ये सातजणांचे अर्ज अवैध ठरले. तब्बल २६जण येथे िरगणात आहेत. लातूर ग्रामीणमध्ये सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. आता २५जण िरगणात आहेत. अहमदपूरमध्ये तिघांचे अर्ज अवैध ठरले. येथे १८जण िरगणात आहेत. १ ऑक्टोबपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून मंगळवार व बुधवार हे दोन दिवस किती उमेदवार माघार घेतात, त्यावर निवडणूक बहुरंगी होणार की नाही हे ठरणार आहे.