लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर जिल्ह्यतील एका कुक्कुटपालन केंद्रात ३३३ हून अधिक कोंबडय़ांचा मृत्यू झाला होता,  त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झालेला नाही असा तपासणी अहवाल  प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्या तरी पालघर जिल्हा बर्ड फ्ल्यूपासून सुरक्षित असल्याने पक्षी पालन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यत व विशेषत: पालघर तालुक्यात कोंबडय़ा, कावळे, कबुतर व चिमण्या मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडल्या होत्या. पालघर तालुक्यातील गिराळे येथील एका कुक्कुटपालन केंद्रात   ३३३ हून अधिक कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याने काही प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. या बाबतची माहिती पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.  जंगली पक्षी तसेच मृत कावळे, कबुतरे यांचे नमुने तपासले असता त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे  जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर पालघर तालुक्यातील गिराळे येथील मृत कोंबडय़ाचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल हाती आला असता  कोंबडय़ांना बर्ड फ्लू विषाणूची लागण झाली नसल्याचे   स्पष्ट झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यत बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जैव सुरक्षिततेचा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून तालुकास्तरीय शीघ्र कृती दल कार्यरत ठेवण्यात आले आहेत. गिराळे येथील मृत कोंबडय़ांच्या नकारात्मक अहवालामुळे जिल्ह्यतील कुक्कु टपालन व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोंबडी दरामध्ये घसरण

कोंबडीच्या मटणाची मागणी बाजारामध्ये घटल्याने कोंबडीचे दर ३० ते ४० रुपये प्रति किलो कमी झाले आहेत. सध्या जिल्ह्यत जिवंत कोंबडी ११० रुपये किलो तर कोंबडीचे मटण १३० रुपये प्रति किलो या दराने विकले जात आहे. येथील घाऊक व्यापारी तसेच पोल्ट्री व्यावसायिकांकडे पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणात साठा आहे. या ठिकाणी आवश्यक दक्षतेचे उपाययोजना राबवले जात आहेत.  जिल्ह्यत कोंबडीचे मटण व अंडी खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन विभागाची प्रसिद्धीपत्रकात म्हटले असून नागरिकांनी भीती बाळगू नये असे पशु संवर्धन विभागाच्या अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे आवाहन केले आहे.