जालना लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसणे भाजपच्या पथ्यावर पडण्यासारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिला असता तर ती भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली असती.
सुनील आर्दड, सुदाम सदाशिवे यांच्यासह मनसेतील जिल्हापातळीवरील नेतेमंडळी जवळपास दोन आठवडे मुंबईत तळ ठोकून बसली होती. आर्दड यांना उमेदवारी दिली तर मनसेची लोकसभा मतदारसंघातील क्षमता सिद्ध होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते महत्त्वाचे ठरेल, अशी या मंडळींची भावना होती. गेल्या वर्षी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जालना येथे झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांची त्याच मैदानावर सभा घेतली. जालना जिल्हा परिषदेतही मनसेने खाते उघडलेले आहे. जिल्हा परिषदेच्या गटात रवी राऊत निवडून आले. जालना नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये या पक्षाला प्रतिनिधित्व मिळालेले आहे.
एकेकाळी भाजपमध्ये विविध पदांवर राहिलेले सुनील आर्दड यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर मनसेचे जिल्ह्य़ात महत्त्व वाढेल, असा पक्का कयास बांधून सदाशिवे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. परंतु उपयोग झाला नाही. जालना जिल्हा निर्मितीपूर्वी सुदाम सदाशिवे आणि भाजपचे लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे एकाच वेळी  भोकरदन पंचायत समिती निवडणुकीतून खऱ्या अर्थाने राजकारणात आले. त्यानंतर दानवे दोनदा विधानसभेवर आणि तीनदा लोकसभेवर निवडून आले आणि चौथ्यांदा उभे आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादीत तीन दशकांपेक्षा अधिक काळ घालविणारे सदाशिवे सध्या मनसेत आहे. त्यांना जिल्हा परिषद सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एवढी दोन प्रमुख पदे मिळाली. मात्र जिल्हापातळीवर ते कायम चर्चेत असतात. दानवे यांच्या विरुद्धचा असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न करून आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाचा लाभ उठवता येईल म्हणून सदाशिवे यांनी आर्दड यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. परंतु मनसेने भाजपच्या विद्यमान खासदाराविरुद्ध उमेदवार देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
जालना लोकसभा मतदारसंघातील सहापैकी सिल्लोडवगळता अन्य पाच विधानसभा मतदारसंघात मनसेने मागील निवडणूक लढविली होती. त्यापैकी पैठणमध्ये मनसे उमेदवार जवळपास २५ हजार मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होता. जालना विधानसभा मतदारसंघात मनसेला कमी मते मिळाली तरी उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जवळपास १२ हजार मते मनसेला मिळाली होती. भाजप व राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातही मनसेचा उमेदवार सहा हजारांपेक्षा अधिक मते घेऊन चौथ्या क्रमांकावर होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भोकरदनमध्ये मनसेचे उमेदवार बबलू चौधरी तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांना ३५ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. सध्या मनसेत असलेले सुदाम सदाशिवे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक बदनापूरमधून लढविली होती आणि ३७ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, असे जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांना वाटत होते. आपला उमेदवार असला तर कार्यकर्ते लोकसभेच्या वेळी अन्य पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत आणि गेली चार वर्षे सुरू असलेल्या विधानसभेच्या बुथबांधणीस धक्का लागणार नाही, असे जिल्ह्य़ातील काही पदाधिकाऱ्यांना वाटत होते.