राज्यावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करु नये. या काळात कोणीही काळाबाजार करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यावसायिकांना केले आहे. मंगळवारी व्हिडिओद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लोकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं. त्याचबरोबर राज्य शासनाच्या विनंतीचा केंद्र सरकारने विचार केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

ठाकरे म्हणाले, ज्या प्रमाणे राज्याराज्यांमधील रेल्वे सेवा केंद्र सरकारने बंद केल्या त्याप्रमाणे देशातर्गत विमानसेवा बंद करण्याची तसेच ३१ मार्च ही विविध परताव्यांची शेवटची तारीख होती ती पुढे ढकलण्यात यावी अशी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. या दोन्ही  विनंतींचा विचार करीत केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली. यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो.

त्याचबरोबर, राज्यावर आलेलं हे संकट मोठं आहे. करोनाचा विषाणू जिथे अद्याप पोहोचलेला नाही तिथे आपल्याला तो पोहोचू द्यायचा नाही. त्यासाठीच सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावं, असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. मात्र, यातून शेतकऱ्यांना शेतावर येणं-जाणं आपण बंद केलेलं नाही. शेतमालाची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवांसाठीच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत ते ठिकाण, तसेच त्यांच ओळखपत्र सोबत ठेवाव. त्यामुळे पोलीसांचा तुम्हाला त्रास होणार नाही, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

जगणं थांबवलेलं नाही थोडी शैली बदललेली आहे

दरम्यान, पोलिसांनाही मी सांगतोय की, आपण आपलं जगणं थांबवलेलं नाही तर जगण्याची शैली थोडासी बदलली आहे. त्यामुळे लोकांना सहकार्य करा. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना आयटी क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र असेल जर वाहतुकीसाठी कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी पोलिसांना १०० नंबरवर संपर्क करा, पोलीस पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पोलिसांचे आभार

काल पोलिसांनी एक कौतुकास्पद काम केलं आहे. काही लाख मास्क त्यांनी धाड टाकून जप्त केले आहेत. अशीच कामगिरी आपल्याकडून अपेक्षित आहे. या संकटाचा कोणीही संधी म्हणून उपयोग करु नये, साठेबाजी करु नये. आपल्याकडे पुरेसा अन्न-धान्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेनं काळजी करण्याचे कारण नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.