एअर इंडियाच्या ना-हरकतीवर औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार की नाही, हे ठरणार आहे. ३ खासगी कंपन्यांनी औरंगाबादहून बँकॉक, क्वाललम्पूर, अबुधाबी येथे उड्डाणे करण्याची तयारी दाखवली असली, तरी एअर इंडियाकडून सकारात्मक वा नकारात्मक कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने सगळे घोडे अडले आहे.
औरंगाबादहून ‘फ्लाय दुबई’, ‘एअर एशिया’ व ‘इंडिगो’ या कंपन्यांनी अबुधाबी, क्वाललम्पूर, बँकॉक येथे उड्डाणांची तयारी असल्याचे विमानतळ प्राधिकरणास कळविले आहे. मात्र, एअर इंडियाकडे पुरेसा पाठपुरावा होत नसल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे गाडे अजून धावपट्टीवर आलेले नाही. तसेच हवाई मालवाहतुकीच्या (एअर कार्गो) अंमलबजावणीची गत आहे. हे काम तर कमालीचे संथ असल्याचा खेद वाटतो, या शब्दांत केंद्रीय अबकारी विभागाचे आयुक्त कुमार संतोष यांनी नाराजी व्यक्त केली.
आंतराराष्ट्रीय विमानतळ आणि एअर कार्गोबाबतची अधिसूचना काढून पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मालवाहतुकीसाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, या विषयीच्या सूचना देण्यासाठी एप्रिलमध्ये बठक घेण्यात आली. तत्कालिनअर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या कार्यकाळात ही अधिसूचना मंजूर झाली. सीमाशुल्क विभागासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तथापि विमान प्राधिकरणाकडून त्याच्या अंमलबजावणीत चालढकल झाली. आवश्यक ते बांधकामाचे प्रकल्प लवकरच हाती घेण्यासाठी निविदा काढण्यात आली व उर्वरित काम डिसेंबपर्यंत पूर्ण केले जाईल, असे प्राधिकरण संचालक आलोक वार्सने यांनी सांगितले.
प्रवाशांचे सामान तपासण्यास आवश्यक कन्व्हेनिअर बेल्ट व स्कॅिनग मशीनची गरजही पूर्ण होऊ शकली नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी सीमा शुल्क विभाग व अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची गरज आहे. पाळीव प्राण्यांसाठी पशुसंवर्धन विभाग, औषधांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यक्ती तसेच अन्यही सुविधा मिळाव्यात, असे सीमा शुल्क विभागाच्या आयुक्तांनी कळविले होते. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
हवाई वाहतुकीतून औरंगाबादहून ५ हजार कोटींची उलाढाल होऊ शकते. एकटय़ा एन्ड्रर्स हाऊजर्स कंपनीची निर्यात उलाढाल ७०० कोटी रुपयांच्या घरातील असल्याचे अबकारी विभागातील अधिकारी सांगतात. त्यामुळे कर मिळण्याची मोठी संधी दिसते आहे. मात्र, अजूनही आंतरराष्ट्रीय धावपट्टी सापडेना, अशी स्थिती आहे.
‘‘एअर इंडियाने ना-हरकत द्यावी किंवा त्यांच्या विमानांनी उड्डाणे सुरू करावीत. तसे झाल्यास बुद्धिस्ट सर्किटमधील पर्यटनाला चांगला वाव मिळू शकतो. तसेच आयात-निर्यातीमध्येही वाढ होऊ शकेल. त्यासाठी पाठपुरावा करू.’’
राम भोगले, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर