शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आदिवासी व भटक्या समाजाला विकासापासून वंचित ठेवले. त्यांना गावोगाव याचा जाब विचारला जाईल, असा इशारा शिवराज्य पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी नितीन उदमले यांनी दिला आहे.
तालुक्यातील लाडगाव येथे शिवराज्य पक्षाच्या शाखेचे उदमले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी उदमले म्हणाले, की खासदार वाकचौरे यांच्यामुळे आधीच दुबळा असणारा हा समाज वीस वर्षे मागे फेकला गेला असून हा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवराज्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. प्रत्येक आदिवासी भटक्या कुटुंबातील किमान एक सरकारी नोकरीत गेल्याशिवाय हा समाज मुख्य प्रवाहात येणार नाही. आजही केंद्र व राज्य शासनाचा विविध विभागांत हजारो जागा रिक्त आहेत. म्हणून आदिवासी भटक्या समाजातील तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवड होण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ. तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारू इच्छिणा-या तरुणांना सर्वतोपरी सहकार्य करू, असेही उदमले म्हणाले.
या वेळी जिल्हा सचिव टिळक भोस, जिल्हा संघटक नवनाथ आढाव, राहाता तालुकाध्यक्ष सचिन चौगुले, तालुकाध्यक्ष योगेश अहिरे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात लाडगाव शाखेचे पदाधिकारी निवडण्यात येऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. अध्यक्ष म्हणून प्रदीप भालेराव, उपाध्यक्ष सतीश गोलवड, कार्याध्यक्ष गणेश भांड, सचिव नवनाथ भांड, सहसचिव बाबासाहेब बर्डे, संघटक डॉ. नामदेव फलके, कोषाध्यक्ष अजित चोरगे, निमंत्रक सोमनाथ भांड, प्रवक्ता किरण भालेराव, सदस्य नरेंद्र भांड, गोकुळ भांड आदींची निवड झाली. बाबासाहेब भांड यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पवार यांनी आभार मानले.