इचलकरंजी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी प्रथमच विक्रमी अर्ज दाखल झाले. सत्तारुढ काँग्रेस -राष्ट्रवादीच्यावतीने तब्बल सहा, तर विरोधी शहर विकास आघाडीकडून तीन उमेदवारांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पवार यांच्याकडे हे अर्ज सादर करण्यात आले. सत्ताधाऱ्यांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अनुपस्थिती पालिकेत चच्रेचा विषय ठरला होता.
नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर यांची १५ जून रोजी मुदत संपत आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पवार यांच्याकडे सत्ताधारी काँग्रेसने सहा, तर शहर विकास आघाडीने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये सत्ताधारी काँग्रेसकडून शुभांगी बिरजे, तेजश्री भोसले, शकुंतला मुळीक, सुरेखा इंगवले, रेखा रजपुते आणि  छाया पाटील यांच्या अर्जाचा समावेश आहे. अर्ज दाखल करताना नगराध्यक्षा  मुजावर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, पक्षप्रतोद सुनील पाटील, अशोक आरगे, गटनेते बाळासाहेब कलागते, राष्ट्रवादीचे अशोक जांभळे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. विरोधी शहर विकास आघाडीच्यावतीने नगराध्यक्षा पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्ष कार्यालयात बठक झाली. बठकीत ठरल्याप्रमाणं नगरसेविका संगीता आलासे, ध्रुवती दळवाई आणि लक्ष्मी बडे या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, तानाजी पोवार, जयवंत लायकर यांच्यासह आघाडीतील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं काँग्रेसच्यावतीनं नगराध्यक्षपदासाठी ६ अर्ज दाखल केले आहेत.