ठेकेदाराचाही करार रद्द करण्याचा निर्णय

वसई-विरार महापालिकेच्या तरणतलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना महापालिकेने गंभीरतेने घेतली असून ठेकेदाराचा करार गुरुवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तरणतलावांची तपासणी का केली नव्हती, याबाबत पालिकेने अभियंता आणि साहाय्यक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील ओम नगर येथे महापालिकेचे तरणतलाव आहे. रविवार, ७ एप्रिल रोजी या तरणतलावात युग लाडवा (८) या बलाकाचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदारा आणि प्रशिक्षकांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिकेने गुरुवारी या प्रकरणी ठेकेदाराचा करार कायमस्वरूपी रद्द केला, तर अभियंता आणि साहाय्यक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती पालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी होती. तो मुलगा तरणतलावातून बाहेर आला होता आणि नंतर पुन्हा तरणतलावात गेला तरी प्रशिक्षकांचे लक्ष नव्हते, असे ते म्हणाले. कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. अभियंता आणि साहाय्यक अभियंत्याकडे तरणतलावाच्या सुरक्षेची तपासणी करण्याची जबाबदारी होती, ती त्यांनी केली नाही म्हणून त्यांना नोटिसा बजावल्याचे पवार यांनी सांगितले.