पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सभेने सुरू झालेल्या व शिगेला पोहोचलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी भाजप युमोच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे यांच्या परळीतील सभेनंतर थंडावल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सभांनी प्रचाराची रंगत वाढवली. जाहीर प्रचार थांबल्यानंतर आता उमेदवारांच्या यंत्रणा ‘४८ तासांत लक्ष्मीदर्शना’ची पर्वणी साधून आपले पारडे जड करण्यावर ‘भर’ देण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे.
मोदी यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाने पहिल्या टप्प्यात भाजप उमेदवारांची बाजू भक्कम होण्यास मदत झाली. सहाही मतदारसंघांत प्रमुख पक्षांचे उमेदवार असल्याने तिरंगी, चौरंगी लढती असल्या, तरी मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादीमध्येच होत आहे. इतर पक्षांचे उमेदवार कोणाची किती मते खेचतात, यावर निकालाचे पारडे फिरणार आहे. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे यांनी प्रत्येक मतदारसंघात प्रमुख ठिकाणी सभा घेताना प्रचाराचा समारोप त्या उमेदवार असलेल्या परळी मतदारसंघात प्रचारफेरी काढून केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांनी माजलगावचे उमेदवार आर. टी. देशमुख यांच्यासाठी तेलगाव, तर आष्टीचे उमेदवार यांच्यासाठी दोन प्रचारसभा घेतल्या.
शिवसेनेचे उमेदवार अनिल जगताप यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन भाजपसह दोन्ही काँग्रेसवर हल्ला चढविला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजलगावचे प्रकाश सोळंके व परळीचे धनंजय मुंडे यांच्यासाठी सभा घेऊन भाजपवर हल्ला केला. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांच्यासह सहा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी काँग्रेसचे माजी मंत्री ज्योतिरादित्य िशदे यांची सभा झाली. राष्ट्रवादीचे अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्यासाठी सभा घेतली. राष्ट्रवादीचे राज्याचे इतर नेते मात्र या वेळी जिल्हय़ात फिरकले नाहीत. गेवराई, बीड व केज या मतदारसंघांकडे पवारांनी पाठच फिरवली. आता जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी ‘लक्ष्मीदर्शना’च्या बळावर मते खेचण्यासाठी आपापली यंत्रणा कामाला लावली आहे.