बार्शीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरातील दोघांना बाधा

सोलापूर : सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात शुक्रवारी करोनाबाधित नवे १२ रुग्ण आढळून आले. यात बार्शीतील एका वैद्यकीय अधिकारम्य़ाच्या घरातील दोघा व्यक्तींचा समावेश आहे. अक्कलकोटमध्येही पुन्हा पाच रुग्णांची भर पडली आहे.

सोलापूर शहरात चालू जूनमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना काल गुरुवारी मात्र तुलनेत कमी म्हणजे केवळ पाच नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर दोघांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, बुधवारी एकाही मृताची नोंद झाली नसली तरी ७७ रुग्ण सापडले होते. शहरात आतापर्यंत १७५४ रुग्णसंख्या झाली आहे. यात १४५ मृतांचा समावेश आहे. तर जिल्हा ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या १६१ आणि मृतांची संख्या ११ झाली आहे. शहर व जिल्ह्याचा विचार करता रुग्णसंख्या आता दोन हजाराचा टप्पा पूर्ण करण्याच्या बेतात आहे. तर एकूण मृतांचा आकडा १५६ झाला आहे. मात्र दुसरीकडे आतापर्यंत ९९३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेऊ न करोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागात प्रशासकीय यंत्रणेतील एका अधिकारम्य़ाला करोनाची बाधा झाली असून त्याच्याकडे दररोज करोनाबाधित रुग्ण व मृतांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी होती.

अक्कलकोट शहरात तीन तर तालुक्यातील करजगी व मैंदर्गी येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला. अकलूजमध्येही आणखी एका व्यक्तीला करोनाने बाधित केले. बार्शीत दोन, दक्षिण सोलापुरात बोरामणी व नवीन विडी घरकु ल येथेही प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. पाकणी (उत्तर सोलापूर) व चिखली (मोहोळ) येथेही रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण १६१ पैकी सर्वाधिक ७० रुग्ण एकटय़ा द. सोलापूर तालुक्यात सापडले आहेत.