सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरविणे वाटते तितके सोपे नाही. जिद्द, कणखरपणा, अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी या सगळ्या गुणांनी सैन्यदलात आपले स्थान निर्माण करावे लागते. प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठणारे इतरांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात. पुण्याच्या ओम पैठणेची गोष्टही काहीशी अशीच. पुण्याचा ओला कंपनीचा कॅबचालक आता चक्क भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे. या तरुणाचे नाव आहे ओम पैठणे.

ओमच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तो ओलामध्ये चालक म्हणून काम करत होता. हे काम करत असला तरीही त्याच्या मनात सैन्यदलात जाण्याविषयी असणारी इच्छा कायम होती. परिस्थितीवर मात करत त्याने मेहनत घेतली. त्याच्या या श्रमाचे फळ म्हणजे आज तो ऑफीसर म्हणून सैन्यात रुजू होण्यास सज्ज झाला आहे. तरुणांना प्रेरणादायी असणारी ही गोष्ट ओमने सत्यात उतरवून दाखवली ती केवळ आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच. मेजर गौरव आर्य यांनी ट्विटरवरुन कॅडेट ओम पैठणेची प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे.

नेहमीप्रमाणे पुण्यातील एका प्रवाशाने ओला टॅक्सी बुक केली. निश्चित ठिकाणी ओमची ओला पोहचलीही. प्रवासी बसल्यावर ठरलेल्या ठिकाणी जाण्यास टॅक्सी निघाली आणि प्रवासी आणि ओममध्ये गप्पा सुरु झाल्या. हे प्रवासी सैन्यदलात कर्नल होते. बोलता बोलता त्यांनी ओमला सैन्यदलाविषयी बरीच माहिती दिली. तरुणांना सैन्यदलात असणाऱ्या संधींबाबत सांगितले. कर्नल साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे ओम भलताच भारावून गेला आणि त्याने सैन्यदलात जाण्याचे निश्चित केले. त्यादिशेने त्याने अभ्यासही सुरु केला. मेहनत करुन त्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी जॉईन केली. सशस्त्र सीमा दलाची परीक्षा ओमने दिली आणि तो पासही झाला. सध्या त्याचे ट्रेनिंग सुरु असून दहा मार्च रोजी तो ऑफिसर म्हणून पासआऊट होणार आहे.