सोलापूर : अक्कलकोट येथील स्मशानभूमीत एका मृत नातेवाईकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना सरणासमोर थांबलेल्या आपल्या सख्या भावासह दोघांचा हेतूपुरस्सर रॉकेल टाकून पेटवून देऊन खून केल्याबद्दल एका ६० वर्षांच्या वृध्दाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेसह ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मल्लिकार्जुन सिध्दा बाळशंकर असे आरोपीचे नाव आहे.

अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे १७ फेब्रुवारी २०१७ रोजी नागराबाई सोनवणे या महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा अंत्यविधी हन्नूर गावातील स्मशानभूमीत करण्यासाठी नातेवाईकांसह गावकरी एकत्र आले होते. अंत्यविधी सुरू असताना आरोपी मल्लिकार्जुन बाळशंकर (रा. हन्नूर) हा सरणाजवळ आला. तेथे समोरच्या बाजूला अन्य काहीजण उभे होते. परंतु मल्लिकार्जुन याने पेटलेल्या सरणावर रॉकेलचा डबा जोरात ओतला. त्यावेळी सरणाच्या पलिकडील बाजूला त्याचा सख्खा धाकटा भाऊ विश्वनाथ बाळशंकर उभा होता. त्याच्यासह अन्य व्यक्तींच्या अंगावर रॉकेल उडेल आणि त्यांचे प्राण धोक्यात येतील, याची जाणीव असतानादेखील आरोपी मल्लिकार्जुन याने सरणावर रॉकेलचा डबा जोरात ओतला. त्यात उडालेले रॉकेल विश्वनाथ बाळशंकर व तम्मा बनसोडे यांच्यासह अन्य काही व्यक्तींच्या अंगावर पडले आणि आगीचा भडका होऊन ते सर्वजण भाजून जखमी झाले. यातील विश्वनाथ व सोमनाथ हे दोघे गंभीर भाजून मृत्युमुखी पडले. तसेच रमेश बाळशंकर, सलीम मुल्ला, महादेव धोटे आदी तिघेही आगीत होरपळले गेले.

आरोपी मल्लिकार्जुन याने हे कृत्य जाणीवपूर्व करण्यामागचे कारण असे होते की, त्याचा आपला धाकटा भाऊ विश्वनाथ याजबरोबर  शेतजमिनीचा वाद होता. त्यातून दोघांत भांडणे झाली होती. त्यामुळे मल्लिकार्जुन हा विश्वनाथवर चिडून होता. याच कारणावरून त्याने विश्वनाथचा काटा काढण्याचा डाव आखला होता. गावातील मृत नातेवाईक महिलेच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असताना मल्लिकार्जुनने संधी साधली आणि विश्वनाथचा खून करण्याच्या हेतूने त्याच्या दिशेने सरणावर रॉकेल जोरात ओतले. यात विश्वनाथ याच्यासह शेजारी उभा राहिलेला सोमनाथ बनसोडे याचाही हकनाक बळी गेला. तर अन्य तिघे जखमी झाले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद होऊन तपासाअंती आरोपी मल्लिकार्जुनविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची सुनावणी  जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्यासमोर झाली. या  खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १५ साक्षीदार तपासले. पाच नेत्रसाक्षीदार, जखमी साक्षीदार यांच्या जबाबासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल, तसेच परिस्थितीजन्य पुरावा इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरल्या. अ‍ॅड. राजपूत यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून आरोपीला जन्मठेपेसह एकूण ३५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड वसूल झाल्यास त्यातील प्रत्येकी १० हजारांची रक्कम मृत विश्वनाथ बाळशंकर व तम्मा बनसोडे यांच्या वारसदारांना तर प्रत्येकी पाच हजारांची रक्कम सर्व जखमींना अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. बी. अनपट यांनी काम पाहिले.