कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांचे जतन-संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या किरात ट्रस्टतर्फे येत्या १२ ते १७ फेब्रुवारी या काळात वायंगणी (ता.वेंगुर्ले) येथे कासव जत्रा आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या काळात ही कासवे किनाऱ्यावर अंडी घालतात. पण कुत्री किंवा अन्य प्राणी ती पळवतात. तसेच या अंडय़ांपासून बनवलेल्या पदाथार्ंना चांगली मागणी असल्यामुळे चोरीही होते. त्यापासून बचाव करण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने सुहास तोरसकर आणि अन्य स्थानिक गावकऱ्यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोहीम हाती घेतली असून गेल्या वर्षी अशा तऱ्हेने रक्षण झालेल्या अंडय़ांमधून जन्मलेली सुमारे २०० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. या प्रयत्नांमुळे या परिसरातील कासवांचा नैसर्गिक जननदर ४० ते ५० टक्क्यांपासून ७५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. यंदाही सुमारे ८० अंडी असलेले घरटे आढळले असून त्याभोवती संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. या अंडय़ांमधून फेब्रुवारीच्या मध्याला पिल्ले बाहेर येतील, असा अंदाज असल्यामुळे त्या काळात तेथे कासव जत्रा भरवण्यात येणार आहे. वायंगणीच्या ग्रामस्थांनी किरात ट्रस्टच्या सहकार्याने जत्रेचे आयोजन केले असून अंडय़ातून बाहेर पडून समुद्राकडे धाव घेणारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्ले यावेळी पर्यटकांना बघायला मिळतील. त्याबरोबरच वायंगणीच्या किनाऱ्यावर डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारी, जंगल ट्रेक, कासव संवर्धनावरील लघुपट, प्राणी-पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, अस्सल कोकणी लोककलेची झलक दाखवणारा ‘दशावतार’ व मालवणी पदार्थाचा आस्वादही घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क शशांक मराठे (९४२००७९४८९).