10 April 2020

News Flash

‘एक दिवस रंकाळय़ासाठी’ राबले शेकडो हात

चहूबाजूंनी समस्यांच्या जंजाळात फसलेल्या रंकाळा तलावास पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मंगळवारी स्वच्छता मोहीम उघडण्यात आली. ‘एक दिवस रंकाळय़ासाठी’ या नावाने सुरू झालेल्या मोहिमेत दिवसभरात शेकडो हात

| March 18, 2014 03:32 am

चहूबाजूंनी समस्यांच्या जंजाळात फसलेल्या रंकाळा तलावास पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मंगळवारी स्वच्छता मोहीम उघडण्यात आली. ‘एक दिवस रंकाळय़ासाठी’ या नावाने सुरू झालेल्या मोहिमेत दिवसभरात शेकडो हात राबत राहिले. नगरसेवक, महापालिकेचे हजारावर कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या चांगल्या उपक्रमाची सुरुवात आश्वासक रीतीने झाली असली तरी त्यामध्ये संपूर्ण रंकाळा स्वच्छ होईपर्यंत सातत्य राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी नोंदविली.    
करवीरनगरीचे सौंदर्य म्हणून रंकाळा तलावाकडे पाहिले जाते, मात्र हाच रंकाळा प्रदूषित सांडपाण्यामुळे मूळचे सौंदर्य हरवून बसला आहे. शेजारच्या बगिचाची दुरवस्था झाली आहे. तर रंकाळय़ाची तटबंदी जागोजागी उद्ध्वस्त झाल्याने रंकाळय़ाच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे. या पाश्र्वभूमीवर रंकाळा स्वच्छ झाला पाहिजे, असा आवाज नागरिकांतून उमटू लागला होता. त्याची दखल घेत मंगळवारी रंकाळा स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेने केले होते. उपक्रमात सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.     
आज दिवस उगवल्यापासूनच रंकाळा स्वच्छता मुक्तीचा ध्यास घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची पावले रंकाळय़ाकडे वळू लागली होती. सकाळी आठपर्यंत रंकाळय़ाचा परिसर मदतीसाठी धावलेल्या लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. महापौर सुनीता राऊत, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अश्विनी वाघमळे, महापालिकेचे हजारभर कर्मचारी, व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, अनिल चौगुले, केदार मुनिश्वर, अशोक देसाई, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी असे सारे जण या मोहिमेत उतरले होते. त्यांच्या मदतीसाठी दोन जेसीबी, १० डंपर, दोन ट्रॅक्टर यांची सोय करण्यात आली होती.     
एरव्ही परीटघडीचे कपडे घालून वावरणारे अन् कपडय़ावर केसाइतकाही डाग पडू न देणारे नगरसेवक नेहमीचा तोरा बाजूला ठेवून कचरा उचलण्याचे काम मनापासून करताना दिसत होते. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले की एकमेकींच्या साडय़ांची चर्चा करणाऱ्या नगरसेविकाही घमेल्यातून रंकाळय़ातील घाण बाजूला टाकत होत्या. अक्षरश: हजारो हात वेगवेगळय़ा प्रकारची कामे करण्यामध्ये गुंतले होते. जलपर्णी-शेवाळ काढणे, तटबंदीवरील झाडेझुडपे काढणे, तलावाचा काठ व परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे, प्लॅटिक उठाव स्वच्छता, औषध फवारणी, उद्यानातील कचरा निर्मूलन, वृक्षांची देखभाल, रंकाळा परिसरातील अतिक्रमण हलवणे, फेरीवाले, छोटी दुकाने यांना हलविणे, दिवाबत्तीची तपासणी, दुरुस्ती व जोडणी करणे आदी कामांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.     
आजची मोहीम रंकाळा स्वच्छतेच्या दृष्टीने खूपच चांगली झाली. पण त्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी व्यक्त केले. रंकाळा स्वच्छतेसाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी या कामाकरिता नियुक्त केला पाहिजे. स्वच्छ होऊ लागलेला रंकाळा पुन्हा मलिन होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. याचबरोबर या उपक्रमामध्ये जनता, प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याचे कामही झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2014 3:32 am

Web Title: one day sanitation campaign for rankala 2
Next Stories
1 ज्येष्ठ पत्रकार शंकरराव साठे यांचे वृद्धापकाळाने निधन
2 विलासराव पाटील-वाठारकर यांचे निधन
3 जायकवाडीच्या पाण्याला पुन्हा स्थगिती
Just Now!
X