सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शेतकरी विकास मंडळाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळविला. मंडळाचे सर्व उमेदवार दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. कारखान्याचे भवितव्य थोरातांच्या हाती सुरक्षित असल्याची मोहोर सभासदांनी निकालातून उमटवली.
कारखान्याच्या सुरुवातीच्या काळातील निवडणुका अतिशय संघर्षपूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर मागच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्या. या पार्श्र्वभूमीवर कारखान्याची ही निवडणूक लक्षवेधी ठरली. विरोधकांनी सुरुवातीपासूनच चंग बांधला होता. परंतु त्यांना सर्व जागांवर उमेदवारही उभे करता आले नाही. २१ पैकी सहा जागांवर त्यांना उमेदवार देता आले. शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ खांडगाव येथे दणक्यात झाला  होता.
प्रारंभीच २१ पैकी ९ जागा बिनविरोध जिंकत शेतकरी विकास मंडळाने विजयी सलामी दिली. निवडणुकीचा हाच ट्रेंड अखेरपर्यंत कायम राहिला. किमान एक आणि तीही प्रतिष्ठेची जागा आपल्याला मिळेल हा विरोधी नेत्यांचा दावा सपशेल फोल ठरला. बुधवारी येथील पालिकेच्या क्रीडा संकुलात सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालूच होती. सर्वात अगोदर साकुर गटाची मतमोजणी पूर्ण झाली. या गटात शेतकरी विकास मंडळाचे सर्व उमेदवार ११ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. मतमोजणीचा हा कल अखेरपर्यंत कायम होता. निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. कारखान्यावर प्रारंभीपासूनच थोरात यांची पकड होती, आजच्या विजयाने ती अधिक घट्ट झाल्याचे मानण्यात येते.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. साकुर गट- आमदार बाळासाहेब थोरात (१३,३६६), मीनानाथ वर्पे (१३,०११), गणपत सांगळे (१२,३३०-सर्व विजयी), रामदास शेजूळ १,९५५ (पराभूत). जोर्वे गट- प्रताप ओहोळ (१३,०८४), नानासाहेब िशदे (१३,०२३), बाळासाहेब शिंदे (१३,०३४ सर्व- विजयी), शिवाजी शिंदे (१,५४६) व  संभाजी शिंदे (१२९९, दोघे पराभूत). तळेगाव गट- भाऊसाहेब कुटे (१३,३५३), संपतराव गोडगे (१३,१४८), रोहिदास पवार (१२,४८६-सर्व विजयी), शरद थोरात (२२६८ पराभूत). धांदरफळ गट- पांडुरंग घुले (१३,२८५), रमेश गुंजाळ (१३,०९२), बाळासाहेब मोरे (१२,६५४-सर्व विजयी), वैभव कर्पे (१,६०१) व विजय देशमुख (१,५०४, दोघे पराभूत).
बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे, चंद्रकांत कडलग, मधुकर नवले, संतोष हासे (अकोले जवळे गट), शांताबाई वाकचौरे, गोजराबाई जोंधळे (महिला राखीव), जगन्नाथ आव्हाड (जाती जमाती प्रतिनिधी), अशोक खेमनर (भटक्या जाती जमाती प्रतिनिधी), अभिजित ढोले (इतर मागासवर्गीय) आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माधवराव कानवडे (सोसायटी मतदारसंघ).