शहरातील २ लाख ४५ हजार ६६५ वीजग्राहकांकडे तब्बल ११० कोटींची थकबाकी वसुली रखडलेली, ती कशी व कधी वसूल करणार याचे प्रश्नचिन्ह कायम असतानाच सुरुवातीपासूनच वादाचा झोत अंगावर घेत कारभार सुरू केलेल्या जीटीएलची सूत्रे अखेर पुन्हा महावितरणकडे आली आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजता वीजविषयक कारभाराच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास आली. मात्र, हे सर्व होत असतानाच जीटीएलच्या १ हजार २२ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचे काय, याचे प्रश्नचिन्हही कायम राहिले आहे.
१ मे २०११ रोजी शहरातील वीजविषयक कारभार जीटीएलकडे सोपविण्यात आला होता. राज्यात प्रथमच हा अभिनव प्रयोग करण्यात आला खरा. परंतु तेव्हापासून ते आजपर्यंत, ३ वर्षे ५ महिन्यांच्या काळात जीटीएलला सततच्या बेबंद कारभारामुळे वीज ग्राहकांच्या संतापाचे धनी व्हावे लागले. वीजबिल थकबाकी वसुलीचे पहिल्यापासूनच मोठे आव्हान जीटीएलपुढे होते. मात्र, वसुलीचे आव्हान आणि वीजपुरवठा या दोन्ही पातळ्यांवर जीटीएलची नेहमीच कसरत होत होती. थकबाकी वसुलीचा चेंडू सातत्याने टोलविण्यात येत होता.
महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्याकडे जीटीएलचे जगदीश चेलारामानी यांनी शनिवारी दुपारी सूत्रे सुपूर्द केली. या बरोबरच जीटीएलचा वादाचा कारभार आता इतिहासजमा झाला आहे. शुक्रवारपासूनच या संदर्भातील हालचालींना कमालीचा वेग आला होता. शनिवारी या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला. जीटीएलचे हस्तांतरण महावितरणकडे झाले असले, तरी जीटीएलच्या १ हजार २२ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचे काय, हा प्रश्न मात्र अधांतरीच राहिला आहे. या कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेणार काय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शहराच्या निम्म्याअधिक भागात वीज खंडित झाली होती. त्याचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर मोठाच परिणाम झाला. नक्षत्रवाडी येथे जीटीएलकडून होणारा वीजपुरवठा शुक्रवारी रात्री अचानक खंडित झाला. तो शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता पूर्ववत झाला. मात्र, वीजपुरवठा बंद पडल्याने सुमारे १२ तास नक्षत्रवाडी येथील बुस्टर पंपगृह बंद होते. त्यामुळे फारोळा येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र बंद होते. फारोळा येथून नक्षत्रवाडीपर्यंत येणारा पाणीपुरवठा नक्षत्रवाडी येथेच वीज नसल्याने बंद होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावर विपरित परिणाम झाला.  
वीज खंडित झाल्यामुळे जलवाहिनीतील दाब कमी झाला. संबंधित अधिकारी तो नियमित करण्यास झटून प्रयत्न करीत आहेत. त्यास आणखी काही तास लागतील. दरम्यान, शनिवारीही शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. उद्याही (रविवारी) शहराचा पाणीपुरवठा काही प्रमाणात प्रभावित होऊ शकतो, असे कळविण्यात आले आहे.