पोलीस वसाहतीच्या जागा व्यापारी तत्वावर विकसित करून घरकुल बांधण्याचा प्रस्ताव नाकारत गृह विभागाने आता घरकुल बांधण्यासाठी हुडकोकडून एक हजार कोटी रूपये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे दिली. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १०८ वा दीक्षांत सोहळा शुक्रवारी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ६१ हजार कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात त्यातील १२ हजार जणांना समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगितले.
मुंबईसह राज्यातील काही भागात पोलीस वसाहतीतील इमारती अतिशय जुन्या झाल्या आहेत. धोकादायक स्थितीत अधिकारी व कर्मचारी तिथे वास्तव्य करतात. वसाहतीच्या जागा व्यापारी तत्वावर विकसित करून घरकुल बांधणी करण्याचे सुचविले गेले होते. परंतु, तो प्रस्ताव गृह विभागाने नाकारला असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
पोलीस दलाकडे मुळात अतिशय कमी जागा आहे. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी आता कर्ज उभारण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. विकास आराखडा तयार करताना त्यात सुरक्षा यंत्रणेसाठी जागा आरक्षित केली जावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे. दीक्षांत सोहळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी १५४४ उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात समाविष्ट झाली. परंतु, अद्याप अडीच हजार उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे लवकर भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सूचित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुंबई-ठाणे परिसरात इमारती कोसळण्याचे सत्र सुरू असून संबंधित विकासकांवर ‘मोक्का’ लावता येईल की नाही, याबद्दल काहिशी संदिग्धता व्यक्त करत पाटील यांनी पोलीस दोषींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करतात, असे नमूद केले. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यास यापूर्वी संबंधितांवर दोन गुन्हे दाखल असणे आवश्यक आहे.
या पद्धतीने विकासकावर काही गुन्हे दाखल आहेत काय, याची छाननी केली जाईल. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा इमारती उभ्या राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली.