सोलापूर : सोलापुरात करोनाचे भयसंकट वरचेवर वाढत असतानाच प्रशासनाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधा तोकडय़ा पडत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन्स व ऑक्सिजन पुरवठा, कोविड  रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता दिसून येते. या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन्स केवळ दहा टक्के रुग्णांसाठीच उपलब्ध करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये गोंधळाची स्थिती दिसून येते.

रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वापर ८५ टक्के करोना रुग्णांना करण्याची गरजच नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आवश्यकता नसताना ‘रेमडेसिविर’चा वापर होतो. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा परिस्थितीमुळे गोंधळ दिसून येतो. यात रेमडेसिविरच्या काळाबाजाराला ऊ त आला आहे. सोलापूर जिल्ह्यातून शेजारच्या कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर भागातून जादा दर मोजून रेमडेसिविर आणले जात असल्याचेही सांगितले जात आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा गोंधळ आणखी वाढला असून आता एकूण रुग्णांच्या अवघ्या दहा टक्के रुग्णांसाठीच रेमडेसिविर उपलब्ध होणार असल्याचे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. कोविड  रुग्णालयातच संबंधित गरजू करोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन्स उपलब्ध होतील. यात डॉक्टरांनी रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देऊ  नये. अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शिवशंकर यांनी दिला आहे.

रोज केवळ पाचशे इंजेक्शन्स

करोना रुग्णांना केवळ दहा टक्केच रेमडेसिविर उपलब्ध होत असल्यामुळे गंभीर प्रकृती झालेल्या आणि रेमडेसिविरची गरज असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन्स उपलब्ध झाले नाही तर त्या रुग्णाची प्रकृती आणखी खालावत जाऊ न प्रसंगी रुग्ण दगावण्याची भीती असते, असे कोविड रुग्णालयातील डॉक्टर सांगतात. सध्या शहरात दररोज साधारणत: दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची गरज असताना प्रत्यक्षात पाचशे ते सहाशे एवढेच रेमडेसिविर उपलब्ध होत आहेत.

साताऱ्यात नवे ११०० बाधित; जिल्ह्य़ात १४ रुग्णांचा मृत्यू

वाई : साताऱ्यात मंगळवारी ११०० करोना बाधित नव्याने आढळून आले तर १४  रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. विविध रुग्णालयांत आणि करोना काळजी केंद्रातून उपचार घेत असलेल्या ३५५ नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालय, उपरुग्णालय, करोना काळजी केंद्रांमध्ये तीन हजार ५२३ खाटा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.