येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी खुले करण्यात आले. तब्बल ८ महिन्याची प्रतीक्षा संपली असून गेल्या तीन दिवसात भाविकांची दर्शनाला गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बुधवारपासून दर रोज दोन हजार भाविकांना मुख दर्शनाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

मात्र दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी आणि आरोग्य विषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी सकाळी ६ वाजता खुले करण्यात आले.  श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस १ हजार भाविकांना रोज दर्शन घेता येत होते. मात्र भाविकांची गर्दी लक्षात घेता नोंदणीची संख्या वाढविण्यात आली आहे.आता दररोज २ हजार भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान दर्शनाची सोय करण्यात आल्याची माहिती समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

सध्या दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत मंदिर खुले ठेवले जाणार आहे. यासाठी येणाऱ्या भाविकांना  http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर नोंद करण्याचे आवाहन केले आहे.

नियमावली..

* दर्शनासाठी संकेत स्थळावर नोंद आवश्यक

* पास तपासणीनंतर प्रवेश

*  करोनासाठी आवश्यक आरोग्य तपासणी, उपाययोजना

* करोनाकाळात अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद

* १० वर्षांखालील बालक आणि ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना प्रवेश बंद