महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र पळविणाऱ्या इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने ३-४ महिन्यांत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेले १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
वसीम अक्रम बेग (वय १९, इराणी गल्ली, परळी, जिल्हा बीड) असे या मंगळसूत्र चोराचे नाव आहे. त्याने औरंगाबादसह पुणे, नाशिक, जळगाव येथेही मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. परळीच्या इराणी टोळीच्या मुख्य सरदाराचा बेग हा मुलगा असून त्याचे अनेक साथीदार भूमिगत झाले आहेत. यातील काहींना पुणे व हैदराबाद येथे पोलिसांनी पकडले आहे.
बेग याला गेल्या मंगळवारी शहरातील बीड बायपास रस्त्यावर विनाक्रमांकाच्या मोटारसायकलसह पोलिसांनी पकडले होते. बीड बायपासवरील देवळाई चौकात ही मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी त्याला हटकले. या वेळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता बेग असे त्याचे नाव असून इराणी टोळीचा तो अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. बेग याने शहरात इराणी टोळीच्या इतर साथीदारांसह तीन-चार महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी मंगळसूत्र चोऱ्या केल्या. सिडको ए ८ भागात एका महिलेचे तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सिडको लोकसेवा स्टेशनरीच्या बाजूने बजरंग चौकात एका महिलेची १४ ग्रॅमची सोन्याची साखळी, बजाजनगर स्वाध्याय केंद्राजवळ वाळूज एमआयडीसी भागात एका महिलेची दहा ग्रॅमची सोनसाखळी, नाशिक रस्ता तारांगण सोसायटी भागात एका महिलेचे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र ओढल्याची कबुली बेगने दिली. पोलीस कोठडी दरम्यान तपासात त्याने १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले.
विवाहितेनेच भामटय़ाला पकडले
दरम्यान, गारखेडा परिसरातील हिंदुराष्ट्र चौकात कन्याशाळेसमोरून जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा चोरटय़ाचा प्रयत्न या विवाहितेच्या सतर्कतेमुळे फसला. या विवाहितेने धाडस दाखवून हा प्रयत्न करणाऱ्या भामटय़ाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचे अन्य साथीदार मात्र मोटारसायकलवर पळून गेले. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. किरण कौतिक वाघ (वय २०, गजानननगर, गारखेडा परिसर) यांनी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. शेख सलीम शेख अकबर (वय २४, इंदिरानगर, बायजीपुरा) व त्याचे दोन साथीदार बडय़ा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि सुजाउद्दीन (बाजीपुरा) यांनी हा प्रयत्न केला. शेख याने मंगळसूत्र ओढले. तीन हजार रुपये किमतीच्या या मंगळसूत्राचा एक तुकडा त्याच्या हातात आला. शेख हा तुकडा घेऊन त्याच्या दोघा साथीदारांसह मोटारसायकलवर बसून पळून जाऊ लागला. या वेळी किरण वाघ हिने शेखला पकडले. परंतु त्याचे दोघे साथीदार मोटारसायकलवरून (एमएच २० सीई १४१) पसार झाले.