वीज बिलाच्या बाबतीत वीजवितरण कंपनीकडे ग्राहकांची तक्रार आल्यास या तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन  त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी दिली.
माणगाव येथील कुणबी भवन सभागृहात ना. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव पंचायत समितीची आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार अशोक साबळे, माजी सभापती बाबूराव भोनकर, अ‍ॅड. राजीव साबळे, ज्ञानदेव पवार, माजी सभापती प्रभाकर उभारे, माणगावच्या तहसीलदार श्रीमती वैशाली माने, गटविकास अधिकारी डी. एम. चिनके तसेच पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. तटकरे म्हणाले, राज्यात वीज मीटर बदलण्याचा कार्यक्रम घेण्यात आली आहे. वीज देयके ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिले घरपोच देण्याची व्यवस्था वीज वितरण कंपनीने करावी. वीज मीटर बदलण्याबाबतची माहिती जाहिरातीद्वारे वीज वितरण कंपनीने द्यावी. वीज वितरण कंपनीतील रिक्त पदांची माहिती त्वरित सादर करावी. ना. तटकरे पुढे म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाच्या संदर्भात ९ डिसेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांच्या एसटीच्या संदर्भात काही सूचना असल्यास या बैठकीमध्ये त्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दहिवली, मोरबा पाणीपुरवठा योजनांची माहिती सविस्तरपणे सादर करावी, अशा सूचना त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, रस्ते या विषयांच्या समस्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊन ना. तटकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या वेळी अ‍ॅड. राजीव साबळे, ज्ञानदेव पवार, माजी आमदार अशोक साबळे यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.
प्रारंभी बैठकीत भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी शारदामाता धर्माधिकारी, सद्गुरू वामनराव पै यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.