वीज कंपनीने जालना जिल्ह्य़ासाठी १ अब्ज ५८ कोटी खर्चाचा पायाभूत आराखडा (योजना क्र. २) प्रस्तावित केला आहे. जिल्ह्य़ात वीज कंपनीचे दोन विभाग आहेत. पैकी जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या ४ तालुक्यांच्या विभागासाठी (विभाग १) या पैकी ८८ कोटींची कामे प्रस्तावित आहेत, तर ७० कोटींचा प्रस्तावित आराखडा विभाग क्रमांक दोनसाठी आहे.
या प्रस्तावानुसार जिल्ह्य़ात १ हजार ५९८ नवीन रोहित्रे उभारावयाची आहेत. पैकी ८२० रोहित्रे विभाग क्र. १ मध्ये व ७७८ रोहित्रे विभाग क्र. २ मध्ये उभारावयाची आहेत. जिल्ह्य़ात ३३/११ केव्हीची नवीन ९ उपकेंद्रे उभारावयाची आहेत. ३३ केव्हीची २०७ किलोमीटर वाहिनी टाकणे, ११ केव्हीची ६०९ किलोमीटर वाहिनी टाकणे आणि १ हजार ४६२ किलोमीटरची नवीन लघुदाब विद्युतवाहिनी टाकणे आदी कामे या पायाभूत आराखडय़ात प्रस्तावित आहेत.
कृषी पंप, औद्योगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा आदी विद्युत ग्राहकांचा विचार करून हा पायाभूत आराखडा (इन्फ्रा-दोन) तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावित आराखडय़ातील कामांना प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्राची उभारणी, ३३ व ११ केव्हीची उच्चदाब वाहिनी, तसेच अन्य कामांच्या निविदा सुमारे ७ महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आल्या. १ अब्ज १३ कोटी रुपये खर्चाची ही कामे आहेत.
या पूर्वीच्या पायाभूत विकास आराखडय़ातील (इन्फ्रा-१) अनेक कामे पूर्ण झाली. त्यानुसार जिल्ह्य़ात ३३/११ केव्हीची नवीन १३ उपकेंद्रे उभारण्यात आली. ३३ केव्हीची १३८ किलोमीटर नवीन उच्चदाब विद्युतवाहिनी टाकण्यात आली, तर ७९६ किलोमीटर ११ केव्हीची नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्यात आली. १९५ किलोमीटरची लघुदाब वाहिनी टाकली. १ हजार ४८६ रोहित्रे उभारण्यात आली. पायाभूत आराखडा क्र. एक (इन्फ्रा-१) मधील या कामांवर आतापर्यंत १ अब्ज ६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.