अलिबाग पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल
न्यायालयाने बलगाडी स्पर्धाच्या आयोजनावर बंदी घातली असली तरीही ग्रामीण भागात हौशी आयोजकांकडून बलगाडी स्पर्धाचे आयोजन सुरूच आहेत. अलिबाग तालुक्यातील चाळमळा येथे बेकायदेशीरपणे बलगाडी स्पर्धाचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बलगाडा शर्यतीवर केंद्र सरकारने बंदी उठवली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बलगाडा शर्यतींवर बंदी उठवण्याची अधिसूचना काढली होती. केंद्राच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राज्यातील बलगाडा स्पर्धा आणि तामिळनाडूमध्ये जल्लिकट्ट या बलांच्या स्पर्धावर बंदी कायम ठेवली. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आणि पेटा या प्राणिप्रेमी संस्थांनी या याचिका दाखल केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक काढून जिल्ह्य़ात बलगाडी स्पर्धाच्या आयोजनावर बंदी घातली होती. न्यायालयाच्या या बंदीआदेशानंतरही रायगड जिल्ह्य़ात बलगाडी स्पर्धाचे आयोजन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थळ येथील चाळमळा समुद्रकिनाऱ्यावर १७ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान बलगाडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचक्रोशीतील हौशी बलगाडी चालक या स्पध्रेत मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. या स्पध्रेदरम्यान बलगाडय़ा भरधाव वेगात पळवण्यात आल्या आणि बलांवर अमानुष अत्याचार करण्यात आले.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१) आणि भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३)- १३५ अन्वये स्पध्रेच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. साहाय्यक फौजदार पांडुरंग कापडेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.