येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्राणवायू वाहिनी स्फोट होऊन निकामी झाली. हा प्रकार लक्षात येताच ही वाहिनी तातडीने बदलण्यात आली. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील पुरुष उपचार विभागात सध्या करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासते. त्यांना तो वाहिनीद्वारे खाटेपर्यंत पुरवला जातो. ही वाहिनी खराब झाल्याने कमी तीव्रेतेचा स्फोट होऊन फुटली. यावेळी झालेल्या आवाजाने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ त्या रुग्णांना पर्यायी नलिकेतून पुरवठा सुरू केला. खराब झालेली वाहिनी रात्रीच बदलून नवीन टाकण्यात आली आहे. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत झाला आहे.