पेड न्यूजमुळे लोकशाही व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आशुतोष यांनी गुरुवारी येथे सांगितले.
आपचे जालना मतदारसंघातील उमेदवार दिलीप म्हस्के यांच्या प्रचारार्थ रोड शो व जाहीर सभा घेण्यासाठी ते आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पेड न्यूजचा मुद्दा काही प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे चर्चेत आला आहे, असे ते म्हणाले. पेड न्यूजचा मोठा वाटा वाहिन्यांकडे जातो. नरेंद्र मोदी यांचा उदो उदो करून आम आदमी पार्टीस बदनाम करण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे. ही पत्रकारिता नसून दुसरेच काही आहे, असा आरोप आशुतोष यांनी केला. गुरुवारी सकाळपासून एका वृत्तवाहिनीवर अरविंद केजरीवाल यांनी मुख्तार अन्सारी यांचे बंधू अफजल यांना धन्यवाद देणारे पत्र लिहिल्याचे वृत्त दाखविले जात आहे. हे पत्र बनावट आहे. त्यावर केजरीवाल यांची सहीही बनावट आहे. या संदर्भात निवडणूक आयोग आणि वाराणसी येथील पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले
या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून पैशाची वारेमाप उधळपट्टी सुरू असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. प्रचारसभांमधून मोदी विविध विषयांवर खोटे बोलतात. भ्रष्टाचाराविरुद्ध ते बोलत असले, तरी गुजरात मंत्रिमंडळातून कोळसा घोटाळाप्रकरणी ३ वर्षे शिक्षा झालेल्या मंत्र्यास त्यांनी काढले नाही. त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर एक वर्षांत देश भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या त्यांच्या घोषणेला काही अर्थ नाही. अण्णा हजारे यांच्याबद्दल आपणास आदर असून ते गुरू व मार्गदर्शक आहेत. परंतु आता त्यांचे आणि आमचे रस्ते वेगळे आहेत. आंदोलनाच्या पद्धती वेगळय़ा आहेत. ते आमच्या मार्गाने चालण्यास तयार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही आशुतोष म्हणाले.