|| नीरज राऊत

करोनाकाळात रक्तपुरवठ्यावर मर्यादा; सेवाभावी संस्थांचा आधार

पालघर : पालघर जिल्ह्यातील सुमारे पावणे दोनशे नागरिकांना थॅलेसेमिया या आजाराने ग्रासले आहे.  आजारावर नियंत्रणासाठी रुग्णांना महिन्याला रक्ताची गरज असते. परंतु करोनाकाळात रक्तसंकलन कमी झाल्याने रक्तपेढ्यांच्या रक्तपुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.  त्यात  करोना संसर्गापासून बचाव करणे आव्हानात्मक ठरत आहे. काही सेवा संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याने काहीप्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यात थॅलेसेमियाचा आजार असणारे १७५ हून अधिक रुग्ण असून त्यामध्ये सहा महिन्यांच्या मुलांपासून १८ ते २० वर्षापर्यंत नागरिकांचा समावेश आहे. या रुग्णांच्या रक्तनिर्माण प्रक्रियेत अडथळा येत असतो. त्यामुळे त्यांना रक्ताची कमतरता भासते. त्याचा परिणाम शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. अशा रुग्णांना आवश्यकतेनुसार दर पंधरा दिवसांनी रक्तपुरवठा करणे  आवश्यक असते.  थॅलेसेमिया रुग्ण पालघर, डहाणू व वसई तालुक्यातील स्थानिक रक्तपेढ्या किंवा मुंबईतील शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यामधून आपल्या रक्ताची गरज भागवत असते. मात्र करोना संक्रमणाचा काळात शासकीय रक्तपेढ्यामधील रक्त संकलन कमी झाल्याने अशा रुग्णांसमोर संकट निर्माण झाले होते. शिवाय आजार सर्वत्र वाढत असताना प्रतिकारशक्तीची मर्यादा असल्याने घराबाहेर पडणे जिकिरीचे होते. विशेषत: ग्रामीण भागातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांसमोर मोठे संकट उभे राहिले होते.

पालघर जिल्ह्यात जव्हार, डहाणू व कासा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये थॅलेसेमिया तपासण्याची सुविधा उपलब्ध असून या आजाराने ग्रस्त नागरिकांना रक्त चढवून घेण्यासाठी ‘डे केअर सेंटर’ उभारण्यात आले आहेत. तरी सुद्धा रक्ताच्या उपलब्धतेच्या अनेक मर्यादा समोर आल्या आहेत. अशा रुग्णांना या उपचार केंद्रमधून रक्तवाढीसाठी पोषक टॉनिक औषध नियमितपणे वितरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पालघर, डहाणू व वसई तालुक्यातील सुमारे ५० थॅलेसिमिया मेजर मुलांना पालघर येथील रतिलाल देवजी चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र बँकेच्या मदतीने करोना काळात विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात येत आहे. रक्ताच्या चाचणीसोबत रक्त चढविण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या साडेतीनशे चारशे रुपयांचा खर्च या समाजसेवी संस्थेमार्फत उचलला जात असून गरजू रुग्णांना मदतीचा हात व नवसंजीवनी मिळाली आहे. उर्वरित रुग्णांना जव्हार ग्रामीण रुग्णालय किंवा ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात येऊन त्यांना रक्त देण्याचे काम सुरू आहे. लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातील उप जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया तपासणीची व्यवस्था असून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘डे केअर कक्षा’मध्ये रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्यात येतो. गरज पडल्यास रुग्णांना ठाणे शल्य रुग्णालयात पाठवण्यात येते. पालघर येथील काही सामाजिक संस्थांनी व रक्तपेढ्यानी मदतीचा हात पुढे केला आहे.

– डॉ. अनिल थोरात, शल्य चिकित्सक, पालघर