जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात मराठा रेजिमेंटचे कुंडलिक माने (वय ३६) शहीद झाले. त्यांच्या वीरमरणाने पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) गावावर शोककळा पसरली. माने यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, विवाहित बहीण, पत्नी राजश्री, मुलगा अमोल, मुलगी आरती असा परिवार आहे.
पँूछ जिल्हय़ातील चक्कादाबाद या लष्कराच चौकीवर पाकिस्तानच्या सैनिकांनी पहाटे हल्ला केला. भारतीय जवान गस्त घालत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मराठा रेजिमेंटचे नाईक सुभेदार कुंडलिक माने यांना वीरमरण आले. शेतकरी कुटुंबातील माने १९९८ साली बेळगावमधील मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. गेली १६ वर्षे ते सैन्यामध्ये सेवा बजावत होते.