पालखी सोहळा व त्यासोबत भक्तीत तल्लीन होऊन चालणारे वारकरी.. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनेक मैलांचा पायी प्रवास.. या एका अनोख्या प्रकाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी भारतातीलच नव्हे, तर परदेशातूनही अनेक अभ्यासक सातत्याने पालखी सोहळ्यात येत असतात. वारी हा जीवनाचा एक भाग मानून वारकरी त्यात मनस्वी सहभागी असतो. पंढरीच्या वाटेवर असताना किंवा मुक्कामी असतानाही तो सातत्याने भजन, कीर्तनात रमतो. हा भक्तिभाव सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा गाभा असला, तरी भक्तीच्या या लवाजम्याला अंतर्गत शिस्त व प्रत्येक कार्यासाठी असलेल्या नियमावलीमुळे नेटकेपणा मिळतो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या आता पंढरीच्या वाटेवर निघाल्या आहेत. पालखीच्या प्रस्थानापासून मुक्कामात येणारी शहरे, गावे व पालखी मार्ग आदी ठिकाणी त्या-त्या जिल्ह्य़ातील प्रशासन, पोलीस यंत्रणा नियोजन करतात. वारकऱ्यांसाठी वाहतुकीचे नियोजन करणे, स्वच्छता व पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे सोहळा पाहण्यास येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची कामे वगळता प्रशासनाला फारसे काही करावे लागत नाही. प्रस्थानापासून सोहळा निघतो व पंढरीत दाखल होतो, तो प्रत्येक दिंडीतील व एकूणच सोहळ्याच्या अंतर्गत नियोजन व शिस्तीच्या जोरावरच. संत तुकोबांचे पुत्र नारायणमहाराज यांनी पालखी हा प्रकार सुरू केला व पुढे त्याला नेटके व शिस्तबद्ध सोहळ्याचे स्वरूप गुरू हैबतबाबा यांनी दिल्याचे सांगितले जाते. सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या हजारांवरून लाखोंवर गेली असली, तरी ही शिस्त कायम असल्यानेच सोहळा डोळ्यात भरतो. दिलेल्या क्रमांकानुसारच दिंडी चालली पाहिजे, लष्कराच्या परेडप्रमाणे रांगेत असलेल्या वारकऱ्यांमध्ये झेंडेकरी, पखवाज वादक, वीणेकरी, टाळकरी यांच्याही जागा ठरलेल्या असतात. सोहळ्यात दिंडय़ांप्रमाणे तुतारी वादक, चौघडा वादक, अश्व यांच्याही जागा ठरलेल्या असतात. परंपरेनुसार पिढय़ान्पिढय़ा सेवेकरी, मानकरी त्यांची ठरलेली कामे चोख करीत असतात.म्
पालखीची विश्रांती, मुक्कामाचे ठिकाण, त्याच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यात शक्यतो कोणतेही बदल होत नाहीत. मुक्कामांच्या ठिकाणांची सोहळ्यापूर्वी पाहणी केली जाते. संस्थानचे विश्वस्त मंडळ, सोहळाप्रमुख व विविध मानकरी, सेवेकरी यांचा नियोजनात सहभाग असतो. पालखी मार्गावर असताना, मुक्कामातून निघताना व मुक्कामी पोहोचताना चोपदाराकडे त्याची धुरा असते. सोहळ्याचा एक मुख्य घटक असलेल्या मुख्य चोपदाराची परंपराही अनेक पिढय़ांची आहे. चोपदाराने इशारा करीत हातातील दंड नुसता उंच धरला, तरी चार- पाच लाखांच्या वारकऱ्यांचा अख्खा पालखी सोहळा स्तब्ध होतो.
पालखी सोहळा मुक्कामी पोहोचल्यानंतर समाजआरती होऊनच पालखी मुक्कामी जाते. याच समाजआरतीत पुढच्या मुक्कामी सकाळी निघण्याची वेळ जाहीर होते व बरोबर त्याच वेळेला सोहळा मार्गस्थ होतो. दिंडीतील वारकऱ्यांच्या काही तक्रारी व समस्या असतील, तर त्या मांडण्याची सोयही समाजआरतीमध्ये आहे. दिलेल्या नियमावलीनुसार काही दिंडय़ा कार्यवाही करीत नसतील, तर याच ठिकाणी त्यांचा समाचारही घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे दिवसभराच्या वाटचालीत कुणाचे हरविलेले साहित्य किंवा वस्तू सापडल्यास त्या समाजआरतीमध्ये चोपदाराकडे दिल्या जातात. या वस्तूंचा जाहीर पुकारा करून ती संबंधितांकडे दिली जाते. ही परंपराही आजवर जोपासली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
भक्तिकल्लोळातही असते शिस्त, नियमावली अन् नेटकेपणा..!
पालखी सोहळा व त्यासोबत भक्तीत तल्लीन होऊन चालणारे वारकरी.. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनेक मैलांचा पायी प्रवास.. या एका अनोख्या प्रकाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी भारतातीलच नव्हे, तर परदेशातूनही अनेक अभ्यासक सातत्याने पालखी सोहळ्यात येत असतात. वारी हा जीवनाचा एक भाग मानून वारकरी त्यात मनस्वी सहभागी असतो.

First published on: 02-07-2013 at 02:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandhari varkaris devotion to discipline