परळी-बीड-नगर हा दीर्घकाळ प्रलंबित रेल्वेमार्ग पूर्ण करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लक्ष घातले आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करून या बाबत त्यांनी पुरेशी तरतूद उपलब्ध करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या मार्गासाठी २ हजार ८०० कोटी निधी लागणार असून राज्य सरकारने मान्य केल्यानुसार अध्र्या वाटय़ातील निधीची तरतूद केल्यानंतर केंद्र सरकार उर्वरित निधी तत्काळ देणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाला आता गती मिळणार आहे.
जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी पूरक ठरणारा हा रेल्वेमार्ग मंजूर होऊन २० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, पुरेशा तरतुदीअभावी या मार्ग उभारणीचे काम रखडले. गोपीनाथ मुंडे यांनी या मार्गाला भरीव तरतूद व्हावी, या साठी आंदोलन करून आवाज उठवला. आपल्या विचाराचे सरकार आल्यानंतर प्राधान्याने हा मार्ग पूर्ण करू, असे स्वप्नही पाहिले. दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या मार्गासाठी एकूण खर्चातील निम्मा खर्च राज्य सरकार करेल, असा करार केला. मात्र, तरीही केंद्रातून भरीव निधी मिळत नसल्याने या मार्गाच्या कामाला गती मिळाली नाही. गोपीनाथ मुंडे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर या मार्गाचे काम ३ वर्षांत पूर्ण करण्याचे धोरण त्यांनी आखले होते. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा या रेल्वेमार्गाबद्दल आशा मावळल्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड येथून केला, त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुंडेंच्या वारस पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, तर खासदार म्हणून डॉ. प्रीतम मुंडे संसदेत गेल्या. मागील ६ महिन्यांमध्ये मुंडे भगिनींनी सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे या बाबत भरीव तरतुदीची मागणी केली. रेल्वे अंदाजपत्रकात सव्वाशे कोटींची मागणी मंजूर झाली असली, तरी या मार्गाला फारशी गती मिळणार नाही.
या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याकडेच पाठपुरावा करण्यात आला. मोदी यांनीही निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी या रेल्वेमार्गात लक्ष घातले. बुधवारी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या मार्गाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. इतकी वर्षे हा मार्ग का रखडला, हे जाणून घेतल्यानंतर हा मार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्रातून एकूण खर्चाच्या ५० टक्के रकमेची तरतूद केली जाईल, राज्यानेही आपल्या वाटय़ाची तरतूद करून या कामाला गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
पंतप्रधानांच्या सूचनेनंतर अवघ्या काही तासांत येत्या मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बठकीत या रेल्वेमार्गाच्या तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. राज्य सरकार आता आपल्या वाटय़ाचा निधीची हमी देणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गासाठी २ हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कळविण्यात आले, तर १ हजार ६०० हेक्टरपकी १ हजार २०० हेक्टर भूसंपादनही झाले. आता पंतप्रधानांनीच थेट आदेश दिल्यामुळे या रेल्वेकामाला गती मिळणार असल्याचे दिसत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जूनला प्रथम स्मृतिदिनाच्या ५ दिवस आधी मुंडेंचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यास खुद्द मोदींनीच लक्ष घातल्याने जिल्हावासीयांना दिलासा दिला आहे.
पंतप्रधानांचे आभार – पंकजा मुंडे
परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे स्वप्न गोपीनाथ मुंडे यांनी पाहिले होते. त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरातच या मार्गासाठी स्वत: लक्ष घालून कामाला गती देण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिले. त्यामुळे हा रेल्वेमार्ग आगामी ३ वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून जनतेच्या वतीने मोदी यांचे आपण आभार मानतो, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.