राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांकडे ३० हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. आगामी तीन वर्षांत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास ७० हजार कोटी खर्च करण्याचा निर्धार आहे. राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी १२ ते १३ हजार कोटी रुपये सिंचनासाठी खर्च केले जाणार असून, केंद्राकडून ३० हजार कोटींची मदत घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिली. ही मागणी उचलून धरताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी,‘हा प्रस्ताव योग्य आहे. त्याच्या पूर्ततेची जबाबदारी राज्य व  केंद्राची असल्याचे सांगत केंद्राकडून ३० हजार कोटी मिळवून देण्याबाबत आपणही जातीने लक्ष घालणार असल्याचे,’ जाहीर केले.
तुळजापूर येथे साडेतीन कोटी खर्चून बांधलेल्या अत्याधुनिक एस. टी. बसस्थानकाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री चव्हाण होते. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, बुलढाणा व नाशिकच्या काही भागात मोठा दुष्काळ आहे. हा दुष्काळ संपविण्यासाठी चव्हाण यांच्यासह राज्यातील नेत्यांसमवेत पंतप्रधानांची भेट घेऊन राज्य कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरूकेले आहेत. त्यातून शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेची पाण्याची परवड कमी होणार आहे. राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यास आंतरराष्ट्रीय बँकांची मदतही घेतली जाणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक भीषण दुष्काळ आपण यंदा अनुभवला, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले,” राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी पुढील ३ वर्षांचा कृतिआराखडा करून अपूर्ण प्रकल्पांसाठी ७० हजार रुपये खर्च केला जाणार आहे.मराठवाडय़ाच्या पाणीयोजनाही यातून पूर्ण होतील. २१ टीएमसी पाणी योजना तीन टप्प्यांत असून हे काम चालू ठेवण्यास निधी दिला जाईल, वाहतूक सेवेसाठी नियामक प्राधिकरण महामंडळ स्थापन करण्याची संकल्पनाही राबविली जाईल. विमानतळावर ज्या पद्धतीने व्यावसायिक सुविधा असतात, तशा सुविधा बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यासाठी पाच शहरांची निवड करण्यात आली आहे.
दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण, पाणीपुरवठामंत्री अ‍ॅड. दिलीप सोपल, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व रजनी पाटील, गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे, आमदार दिलीप देशमुख, बसवराज पाटील व राणा जगजितसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांना पवारांचा टोला
पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी राजकीय भाषण केले. ते राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मात्र, मागण्या आमच्याकडे करतात. तुळजापूरकरांची ही खास पद्धत आहे. दर्शनाला आल्यावर मोकळ्या हाताने जाणार नाही, असा टोला शरद पवार यांनी पालकमंत्री चव्हाणांना लगावला, त्यावर सभागृहात हशा पिकला.