अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रे, मात्र २०० पदे रिक्त

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागात अनेक अत्याधुनिक साधने आणि उपकरणांचा समावेश होत असला तरी ही यंत्रे चालवणारे हात नाहीत. या विभागात २००हून अधिक पदे रिक्त आहेत. या विभागात कंत्राटी पद्धतीने अग्निशमन कर्मचारी भरण्यात आले आहे. या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा ताण अग्निशमन दलावर येत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि होणाऱ्या विस्तारामुळे महापालिकेने अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. २०१९- २० या आर्थिक वर्षांत महापालिकेने अग्निशमन विभागात विविध अत्याधुनिक उपकरणांसाठी तब्बल ६१ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद केली. त्यात ४० मीटर उंचीची टर्न टेबल लॅडर, सात अग्निशमन मोटारसायकली, ७० मीटर उंच जाणारी स्वयंचलित शिडी असणारे अद्ययावत अग्निशमन वाहन, दूरयंत्रणाद्वारे अग्निशमन करण्याची क्षमता असलेले फायर वॉटर मॉनिटर उपकरण, विविध साधने, उपकरणे आणि रसायने यांनी सुसज्ज असलेल्या हॅजमॅट व्हॅनचा समावेश आहे. एकीकडे अत्याधुनिक साधणे ताफ्यात दाखल होत असताना अग्निशमन बलाला कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.

अग्निशमन दलात २२६ मंजूर पदे असून त्यात २० पदे रिक्त आहेत. ती अद्यप भरण्यात आलेली नाहीत. त्यात अग्निशमन विमोचकची (लिडिंग फायरमन) २१ पदे मंजूर असून ती सर्वच्या सर्व रिक्त आहेत. महापालिकने सहा नवीन अग्निशमन केंद्रे प्रस्तावित केली असून त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे.

ठेका कर्मचारीही प्रतीक्षेत

महापालिका स्थापन होण्यापूर्वी नगर परिषद असताना अनेक अग्निशमन कर्मचारी १९९८ पासून ठेका पद्धतीने अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. सलग सेवा बजावूनही पालिकेने सेवेत न घेतल्याने या कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता. औद्योगिक न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना १४ मे २००८ पासून सेवेत कायम करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यांना सेवेत सामावून घेतले नव्हते. १६ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या महासेभमध्येही या ठेका कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. परंतु त्यांना अद्यापही सेवेत घेण्यात आलेले नाही. या ठेका कर्मचाऱ्यांनी अग्निशमन विमोचक पदाकरिता राज्य शासनाचा अभ्यासक्रमही पूर्ण केलेला आहे. मात्र त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही.

अग्निशमन हा पालिकेचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.  अग्निशमन कर्मचाऱ्यांना आग विझवण्याबरोबर, गॅसगळती, रस्त्यावर तेल गळती, पक्ष्यांना वाचवणे, हिस्र श्वापदे पकडणे, समुद्रात, तलावात बुडणाऱ्यांना वाचवणे तसेच इतर आपत्कालीन स्थितीत बचावकार्य करावे लागते. अशावेळी प्रशिक्षित अग्शिमन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. पालिकेने अग्शिनशमन विभाग अत्याधुनिक करण्याबरोबरच पुरसे कर्मचारी तैनात करणे आवश्यक आहे, असे नगरसेवक किरण भोईर यांनी सांगितले. ही पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागात अनेक पदे रिक्त आहेत, तसेच वसई-विरार अग्निशमन विभागाची हद्दही बोईसपर्यंत असल्याने एकाच अग्निशमन विभागावर त्याचा भार येत असतो. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

-किशोर गवस, वसई विरार महापालिका, उपायुक्त.