धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. हेटवणे धरणात १३६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा पडून आहे. मात्र हे पाणी स्थानिक भूमिपुत्रांना पिण्यानसाठी किंवा सिंचनासाठी दिले जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आजपासून पेण ते मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान अशी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या रॅलीत रिकाम्या हंडय़ांची कावड आणि डोक्यावर उपडय़ा घागरी घेऊन खारेपाटातील महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या आहेत. १७ फेब्रुवारी रोजी ही यात्रा मुंबईत दाखल होईल.
धरण तालुक्यात असूनही पेणमधील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासंदर्भात आघाडी सरकारच्या काळातही अशीच संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनाच्या प्रकल्पासाठी निधी देण्याचे मान्य केले होते, पण निधी मिळाला नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे ज्या तालुक्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. ज्या तालुक्यात हेटवणे आणि शहापाडा सारखी धरणे अस्तित्वात आहेत. त्याच तालुक्यात उन्हाळ्यात ३५ गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. खरे तर या भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलसंपदा विभागाने १९९०च्या दशकात हेटवणे धरणाची निर्मिती केली आहे. धरणाचे कामही पूर्ण झाले आहे. धरणात आजही दोन जिल्ह्य़ांना पुरून उरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. पण स्थानिक शेतकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.
हेटवण्याचे पाणी खारेपाटाला मिळावे यासाठी २७ कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली, परंतु तुटीचे कारण दाखवून ती लालफितीत अडकून पडली आहे. ही योजना कार्यान्वित कधी होणार, असा सवाल केला जातो आहे.
मुंबईत सध्या मेक इन इंडियाची धामधूम आहे. देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षति केले जात आहे. मात्र स्थानिकांना आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. योजनांची गाणी आणि गावात नाही पाणी, अशी गत शेतकऱ्याांची झाली आहे. त्यामुळे आधी शेतीला आणि पिण्यासाठी पाणी द्या नंतर परदेशी गुंतवणूकदारांना बोलवा, अशी मागणी आमदार धर्यशील पाटील यांनी दिला आहे.