हापूस आंब्याच्या थेट विक्रीमध्ये नागरिकांची फसवणूक; घसघशीत रक्कम मोजून आणलेल्या फळांत कीड

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : करोना संक्रमण स्थितीत शेतमाल तसेच कोकणातील हापूस आंब्याला उठाव नव्हता. अशा वेळी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काही स्वयंसेवी संस्थांनी हे फळ उत्पादकाकडून थेट उचलून ग्राहकाला पुरविण्याचा प्रयोग सुरू केला. मात्र, तो पूर्णरीत्या फसल्याचे उघड झाले आहे.

कमी पिकलेले फळ झाडावरून काढून त्याची विक्री केल्याने प्रत्यक्षात कापल्यानंतर ते खराब असल्याचे  आढळले आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

हापूसला मुंबईसह सर्वत्र मागणी असते. करोना काळात अर्थात टाळेबंदीत कृषिमालाच्या वाहतुकीवर तसेच बाजारातील विक्रीवर निर्बंध आले होते. त्यामुळे कोकणात मोठय़ा प्रमाणावर आंबा साठल्याचे चित्र होते.

कृषिमाल ग्राहकांपर्यंत थेट पोचावा या उद्देशाने कोकण भूमी प्रतिष्ठान आणि इतर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने देवगड, रत्नागिरी आमि कोकणातील विविध भागांमधून ट्रक भरून आंब्याची विक्री करण्यात आली. यासाठी काही स्वयंसेवी संस्थां पुढे आल्या. या प्रयत्नात शेतकऱ्यांनी विक्री करण्यापूर्वी नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे आंबे देण्यात आल्याचे आढळले.

कोकणातून आलेल्या आंबा कापल्यानंतर त्यापैकी ४० ते ६० टक्के  फळ हे मधून खराब असल्याचे दिसून आले आहे.  ५०० ते ८०० रुपये डझन इतक्या दराने खरेदी केलेल्या ग्राहकांचा यामुळे भ्रमनिरास झाला. ही एक प्रकारची फसवणूक असल्याचा समज पालघर जिल्ह्यात अनेक नागरिकांचा झाला.  बाहेरून आकर्षक रंगाच्या असलेले फळामधून कवळ्या भागात स्पंजयुक्त ऊतक (स्पॉन्जी टिश्यू) अपक्व फळात कायम राहिल्याने फळ कापल्यानंतर त्यात सफेद वा काळ्या रंगाचे भाग असल्याचे आढळत असे. अनेकदा नागरिकांना त्यातून  डागाळलेल्या फळात कीड असल्याचे ंवा फळ झाडावरून पडल्यामुळे असे झाल्याचे वाटले. त्यामुळे कापल्यानंतर ५० ते ६० रुपये प्रति नग असलेले फळ  फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्त केले. ठरलेल्या दराप्रमाणे मालाचा दर्जा राखणे हे आंबा पाठवणाऱ्या शेतकऱ्यांकडून आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आंब्याचा दर्जा बिघडू न देणे आवश्यक आहे. त्यासाठी आंब्याचा दर वाढवून घेण्याचा पर्यायही होता. मात्र, आंबा उत्पादकांनी ग्राहकाला गृहीत धरले. त्यामुळे आमच्या माथी कीड लागलेला आंबा  मारला गेल्याची खंत व्यक्त केली.

हापूसमध्ये फळ ७० ते ७५ टक्के पक्व होईस्तोवर त्यात सफेद रंगाचा स्पॉन्जी टिश्यू  असतो. बऱ्याचदा ५० ते ६० टक्के पक्व असलेले फळ चांगला दर मिळविण्यासाठी झाडावरून वेचले असल्याने या फळातील स्पंजयुक्त पेशींमुळे असा चट्टा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी आंब्याच्या विक्रीसाठी घाई केली. असे अपक्व फळ बाजारात आणल्याने नागरिकांना किंमत मोजून देखील फळाचा आनंद घेता आला नाही.

-तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी पालघर