News Flash

कर सहायक पदाच्या परीक्षेत ‘गोंधळच गोंधळ’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेची बनावट प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सात जणांच्या टोळीसह १४ जणांना पोलिसांनी अटक केली, तर

| June 8, 2015 01:40 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेची बनावट प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सात जणांच्या टोळीसह १४ जणांना पोलिसांनी अटक केली, तर एक जण फरार आहे. पहाटे साडेतीन वाजता औरंगाबाद येथील सिडको, एन-४ येथील पौर्णिक अपार्टमेंट, समृद्धीनगर येथे छापा टाकून बनावट प्रश्नपत्रिकेसह १४ मोबाइल, कार्डरेटर, संगणक, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले. प्रश्नपत्रिका बाहेर फुटल्याचे गोपनीय पत्र पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, परीक्षेनंतर केलेल्या पडताळणीत प्रश्नपत्रिका बाहेर फुटली नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. या घटनेमुळे शहरातील ७ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटल्याची बातमी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाल्यानंतर त्यांनी पहाटे छापा टाकला. प्रतापसिंह महाजन काकरवाल (वय २८, रा. तळेगाववाडी, ता. भोकरदन, जि. जालना), मिर्झा मोहसुद्दीन मंजूर अहमद (वय २३, रा. वानखेडेनगर, हर्सूल, औरंगाबाद), अर्जुन भारत बमनावत (वय २१, रा. प्लॉट नं. १४, राजनगर, जटवाडा रोड, औरंगाबाद) यासह श्रीनिवास नागनाथ बनसोडे यांनी काही विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका देतो म्हणून तब्बल ७५ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यातील काही रक्कम आरोपींनी घेतली होती. श्रीनिवास बनसोडे या आरोपीने व्हॉट्स अपवर प्रश्नपत्रिका पुढे पाठवली. तो या प्रकरणात प्रमुख आरोपी असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांना गोपनीय पद्धतीने पाठविल्या. दुपारी एक वाजता परीक्षा संपल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. चोरमारे व गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी प्रश्नपत्रिकेची व छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. प्रत्येक प्रश्न तपासला असता त्यात कोणतेही साम्य आढळले नसल्याचा दावा जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांनी केला. याबाबतची सर्व कागदपत्रे आणि या पडताळणी समितीचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 दरम्यान, पैशाच्या आमिषापोटी प्रश्नपत्रिका देतो असे सांगून गैरव्यवहार करणारी टोळी पकडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या कृष्णा चैनसिंग मारक (वय २६), ओमनाथ ऊर्फ किशोर काशिनाथ राठोड (वय २५, सर्व राहणार औरंगाबाद), संदीप कचरू मातेरे (वय २८, सिल्लोड), संदीप रामराव शिंदे (वय २७, सिल्लोड), भानुदास पुंडलिक बोर्डे (वय २४, रा. भोकरदन, जि. जालना), रोहित पुंजाराम गिरी (वय २९, रा. माणिकनगर, औरंगाबाद), नीलेश चिंतामण वाघ (वय २५, देवगाव, जि. जळगाव), गणेश पूनमचंद मैन (वय २९, औरंगाबाद), रामेश्वर अण्णा पवार (वय २४, औरंगाबाद), भोलेश्वर सुधाकर साबळे (वय २२, रा. पिंपळगाव, ता. भोकरदन, जि. जालना) या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2015 1:40 am

Web Title: perplexity in assistant tax examination
टॅग : Aurangabad,Examination
Next Stories
1 अवैध वाळूउपशावर कारवाईचा बडगा
2 बीड जिल्ह्य़ात वरुणराजाने साधला मुहूर्त
3 हिंगोलीत अण्णा भाऊ साठे महामंडळात १ कोटींचा अपहार
Just Now!
X