स्थानिक व्यावसायिक वाहनांकडून पथकर वसुलीचा पीएनजी कंपनीचा प्रयत्न पिंपळगावच्या टोल प्लाझावर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करत उधळून लावला. टोल प्लाझाचे दरवाजे तोडून सर्वच वाहनांना टोल मोफत मार्ग खुला करून दिला. दरम्यान, या टोलमधून निफाड तालुक्यातील स्थानिक वाहनांना वगळताना मार्च २०१३ नंतर स्थानिक व्यावसायिक व कृषिमालाच्या वाहनांना ५० टक्के टोल द्यावा लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर हे आंदोलन झाले.
कुणालाही विश्वासात न घेता मनमानी करू पाहणाऱ्या कंपनीच्या कारभाराविरुद्ध आ. अनिल कदम, शिरीष कोतवार, भास्कर बनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दंड थोपटले. सेना स्टाइलने टोल नाक्याचे दरवाजे तोडत सर्वच वाहनांना मोफत प्रवासाचा आनंद दिला. कंपनीने वीस किलोमीटर परिघात खासगी वाहनांना पूर्ण सवलत दिली, तशीच सवलत व्यावसायिक वाहनांना द्यावी, अशी मागणी आ. कदम यांनी केली आहे. पीएनजीच्या मनमानी कारभाराला आमचा विरोध असून चांदवड, इगतपुरी येथील टोल नाक्यांवर स्थानिक सर्व प्रकारच्या वाहनांना टोल माफ आहे.
 तेच धोरण पिंपळगाव येथे असावे, आग्रह आंदोलकांनी धरला. टोल प्लाझाच्या अधिकारी वसुंधरा राव यांनी स्थानिक खासगी वाहनांना स्मार्ट कार्डद्वारे पूर्णपणे टोलमाफी करण्यात आल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच स्थानिक व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. स्थानिक खासगी वाहनांना टोल माफ करण्यासाठी कंपनीने मोफत स्मार्ट कार्ड देण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या खासगी वाहनधारकांकडे हे स्मार्ट कार्ड असेल, त्यांना ही सवलत दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.