डेंग्यूच्या विळख्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्लेटलेट पिशव्यांच्या संख्येत कमालीची वाढ दिसून आली आहे. रक्ताचा तुटवडा या आठवडय़ात काहीसा कमी झाला आहे. कारण तापमानात दडले आहे. २७ अंश सेल्सिअस तापमानात विषाणू वेगाने काम करतात. सध्या तापमान काही अंशाने कमी आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांत प्लेटलेटच्या मागणीत काहीशी घट दिसून येत असल्याचे दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्र चौहाण यांनी सांगिले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे विषाणू कदाचित अधिक ताकदवान होतील, असा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा अंदाज आहे. प्लेटलेटच्या मागणीतील वाढही तेच सांगत आहे. गेल्या वर्षी प्रतिदिन २६ प्लेटलेट पुरवाव्या लागत होत्या. या वर्षांत गेल्या १० महिन्यांतील हिशेब गृहीत धरला, तरी प्रतिदिन प्लेटलेटच्या पुरवठय़ाची सरासरी ४६ पेशींवर गेली आहे. एकाच रक्तदात्याकडून प्लेटलेट घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षी ४२६ वरून ही संख्या १ हजार ३२२ वर गेली आहे. वाढलेले हे प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरले आहे.
विषाणू सशक्त झाल्याचे लक्षण मानता येईल, अशीच ही आकडेवारी आहे. रक्ताचा तसा तुटवडा जाणवत नसला, तरी ते मुबलक आहे, असे नाही. रक्तदान शिबिरांची गरज असल्याचे या क्षेत्रातील मंडळी सांगतात. दरांमध्ये कोठेही वाढ झाली नाही. अगदीच तुटवडा जाणवेल त्या दिवशी रक्तदान शिबिरे घेण्यास सांगितले जाते. एका प्लेटलेट पिशवीची किंमत ४०० रुपये आहे. अन्य वेगवेगळ्या चाचण्यांसाठी अधिक रक्कम लागते. साधारणत: ७०० रुपयांपर्यंत प्लेटलेट मिळू शकतात, असे सांगण्यात आले. सध्या घाबरून जाण्याची स्थिती नाही. मात्र, हा विषाणू सशक्त होत असल्याची लक्षणे असल्याचे मत चौहाण यांनी नोंदविले.