करोना व्हायरसची दहशत पाहता औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे. करोना व्हायरसचा धसका आता राजकीय पक्षांनीही घेतल्याचं यावरुन दिसतं आहे. कारण जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा अशीही मागणी जलील यांनी केली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. त्याआधीच आता एमआयएमने कोरोना व्हायरसचा धसका घेत निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. आता ही मागणी मान्य होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशात आात एमआयएमने करोना व्हायरसचं कारण देत ही निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली आहे. इतकंच नाही तर निवडणूक होईपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमावा अशीही मागणी केली आहे. आजच शरद पवार यांचा नाशिक दौराही करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला. नाशिकमध्ये करोनाचे संशयित चार रुग्ण आढळले होते. मात्र त्यांच्यापैकी कुणालाही करोना व्हायरसची लागण झालेली नाही. असं असलं तरीही करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शरद पवारांनी त्यांचा नाशिक दौरा रद्द केला. त्या पाठोपाठ आता एमआयएमने करोना व्हायरसचं कारण देत महापालिका निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली आहे.