पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. त्यानिमित्त त्यांनी देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना खासदार आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे.

त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशातले मोठे नेते आहेत. ते आता देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांच्या कार्यकालात देशाला राजकीय स्थैर्य आलं आहे. आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणाऱ्या भाजपाकडे एकहाती सत्ता येणे ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे हे मान्य केलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही. त्यांच्या भूमिकेविषयी, कार्याविषयी कितीही वाद असले तरी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.

आजच्या जीएसटी परिषदेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. या परिषदेतून मोदी जनतेला कोणतं गिफ्ट देतील असा सवाल विचारण्यात आला असता राऊत म्हणाले, आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे बघावं लागेल. पण मला खात्री आहे की देशातल्या महागाईसंदर्भातल्या जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, असंही राऊत म्हणाले आहेत.