बेकायदा वाळू उपसा करणारे ६ जेसीबी, ६ ट्रॅक्टर जप्त

श्रीगोंद्यातील वाळू तस्करांविरुद्ध जिल्हा पोलिसांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर केलेल्या कारवाईत बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. तसेच १ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांची वाळू उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रे जप्त करण्यात आली. नव्यानेच रुजू झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अजनुज (ता. श्रीगोंदे) येथील भीमा नदी पात्रात ही कारवाई केली. काही वाळू तस्कर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झालेच.

संतोष कालीदाश जाधव (२२, मुंढेकरवाडी, श्रीगोंदे), वैभव राजेंद्र नलगे (२६, कोळगाव, श्रीगोंदे) व प्रमोद सुनील चिखलठाणे (१९, चिखलठाणवाडी, श्रीगोंदे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच भीमा नदीपात्रात बेकायदा उत्खनन करणारे ६ जेसीबी, ६ ट्रॅक्टर (वाळुने भरलेले) व एक मोटरसायकल असे जप्त करण्यात आले. यासंदर्भात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात भादंवि ३७९, ३४ सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची गुन्हे शाखा, पोलिस मुख्यालय व श्रीगोंदे पोलिसांची पथके कारवाईसाठी तयार करण्यात आली होती.

अजनुज येथील भीमा नदीपात्रात काहीजण बेकायदा वाळू उपसा करुन वाळू चोरी करत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री २.१५ वा. छापा टाकण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. नदीपात्रापासून लांब अंतरावर पोलिसांची वाहने उभी करण्यात आली होती. छापा टाकल्यानंतर अवैध वाळू उपसा करणारे पळून जाऊ लागले. त्यातील तिघांना पकडण्यात आले, इतर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. कारवाईत पोलिसांच्या आरसीपी पथकानेही सहभाग घेतला होता.

श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज जवळील भीमा नदापात्रात पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून बेकायदा वाळू उपसा करणारे सहा जेसीबी जप्त केले.