लोटे येथील इंडियन ऑक्झालाइट या कंपनीतून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर आज दुपारी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर आणि खेडच्या नगराध्यक्ष गौरी पुळेकर यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, या कंपनीतून काही  महिन्यांपूर्वी २९ कामगारांना काढून टाकण्यात आले होते. त्याविरुद्ध मनसेने कंपनीच्या व्यवस्थापनाकडे आग्रह धरल्यानंतर २४ जणांना पुन्हा कामावर घेण्यात आले, पण पाच जणांना वगळण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली तेव्हा संबंधितांना बेकायदेशीरपणे काढून टाकले असल्याचा निवाडा न्यायालयाने दिला. त्यामुळे त्यांना आजपर्यंतच्या सेवेबद्दलची रक्कम न्यायालयाच्या निवाडय़ानुसार देण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. तेथे भरपूर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यकर्त्यांकडून कोणतीही चिथावणी नसताना बेकायदेशीर जमाव केल्याचे कारण दाखवून पोलिसांनी अचानक जोरदार लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे वातावरण तंग झाले. या प्रकरणी सुमारे साठ जणांना अटक करण्यात आली आहे.  
दरम्यान शांततामय पद्धतीने आंदोलन चालू असताना पोलिसांनी अकारण बळाचा वापर केल्याचा आरोप विभागीय संघटक खेडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.  खेड शहरातही या घटनेचे पडसाद उमटले असून बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद करण्यात आली.