दिगंबर शिंदे

करोना विषाणूबाबत समाजमाध्यमातील चुकीच्या प्रचाराचा फटका बसल्याने मांसल कोंबडय़ाची विक्री ५ ते ७ रुपये किलोने करूनही ग्राहक नसल्याने कुक्कुटपालन करणारे शेतकरी दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहेत. ‘संडे हो या मंडे  रोज खाओ अंडे’अशा घोषणेने नावारूपाला आलेला हा व्यवसाय तीन आठवडय़ांमध्ये राज्यात ६५० कोटींच्या नुकसानीत गेला आहे. दुसरीकडे ग्राहकच नसल्याने ३० दिवसांपर्यंत वाढलेले सुमारे एक लाखाहून अधिक पक्षी मातीत गाडावे लागण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमधून जगभर प्रसारित होत असलेल्या ‘करोना व्हायरस’च्या अनाठायी भीतीमुळे तसेच ‘समाजमाध्यमा’वरच्या अतिरंजीत नकारात्मक प्रचाराचा प्रचंड मोठा आíथक फटका कुक्कुटपालन व्यवसायास बसला आहे. हे नुकसान एवढे प्रचंड आहे की या व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात सध्या २ कोटी ‘लेयर्स’ अर्थात अंडी देणारे पक्षी आहेत. यातून दररोज सुमारे दीड कोटी अंडी उत्पादित होतात. गेल्या ४० दिवसांपासून करोनाच्या अफवेमुळे अंडी खपावर प्रतिकुल परिणाम झाल्याने अंडय़ांचे दर कोसळले असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिअंडय़ास दीड रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे दररोज सुमारे २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेने गेल्या ४० दिवसात केवळ अंडी उत्पादकांचे ८० ते ९० कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले आहे.

राज्यात ‘ब्रॉयलर’अर्थात मांसल पक्ष्यांची संख्या सुमारे २.२५ कोटीपेक्षा जास्त असून सध्याच्या कच्च्या मालाच्या किमतीनुसार प्रतिकिलो मांसल कोबंडीच्या उत्पादनाचा खर्च ७० ते ७५ रुपये आहे. करोनाच्या अफवेपूर्वी बाजारात ठोक विक्रीचा दर ८० रुपये होता. चिकन खाल्ल्यानंतर करोना होऊ शकतो अशी अफवा समाजमाध्यमावर पसरल्यानंतर खपच होत नसल्याने  ठोक दर आता ५ ते ७ रुपये किलोपर्यंत कोसळला आहे. त्यामुळे प्रतिकिलोस ६० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा ‘ब्रॉयलर’ व्यावसायिकांना फटका बसत आहे. आकडय़ांच्या भाषेत गेल्या ४० दिवसात हे नुकसान ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

अंडी उबवणाऱ्या ‘हॅचरिज उद्योगा’चेही या अफवेत प्रचंड नुकसान झाले आहे. ‘हॅचरिज’मधून उत्पादित होणाऱ्या एक दिवसाच्या पिलांना गेल्या चाळीस दिवसांपासून उठाव नसल्याने लाखो पिले व अंडी नष्ट करावी लागली आहेत. त्यामुळे या विभागाचेही करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कोंबडी पिलांना ग्राहकच नसल्याने ३० दिवसांपर्यंतच्या सुमारे एक लाखाहून अधिक पक्ष्यांना जिवंत समाधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोमर्ला, व्यंकटेश्वरा आणि नंदा या कंपन्यांनी हा निर्णय घेतला असून गुरुवारी प्रत्यक्ष बेडग येथे पाहणीही सुरू केली आहे.

व्यापारी वर्गाकडूनही गैरफायदा

या परिस्थितीचा बाजारातील ठोक व किरकोळ व्यापारी वर्गानेही गैरफायदा घेतला आहे. प्रत्यक्ष बाजारात ८० रुपये किलोने चिकनचे मांस विकले जात आहे. या तुलनेत अडचणीत आलेल्या उत्पादकाकडून मात्र कमीत कमी दरात खरेदी करण्याचा सपाटा लावला जात आहे.  पोल्ट्री व्यावसायिकही खाद्य पुरवठा थांबला तर तेवढेच नुकसान कमी होत असल्याने मिळेल त्या दराने विक्री करीत असल्याने याचा फायदा व्यापारी वर्ग उठवत आहे.

या संकटाने राज्यातील शेतीपूरक कुक्कुट व्यवसायाचे आजपर्यंत ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. या नुकसानीत रोज १५ ते २० कोटींची भर पडत आहे. आणखी किती दिवस नुकसान सहन करावे लागणार आहे हेही समजत नाही. तेव्हा शासनाने तातडीने या व्यवसायाच्या पाठीशी उभे राहून किमान प्रतिपक्ष्यास दीडशे रुपयांचे अनुदान देऊन हा व्यवसाय वाचविणे आवश्यक आहे अन्यथा हा व्यवसाय नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

-किरण तारळेकर, शत्रुघ्न जाधव खानापूर तालुका पोल्ट्रीधारक संघटना पदाधिकारी