नगर : ‘बोफोर्स’ प्रकरणाने काँग्रेसची जी अवस्था झाली, तीच गत ‘राफेल’ विमान खरेदी प्रकरणात भाजपची होणार आहे. विमान बनवण्याचा कारखाना नसताना अंबानींना पुरवठय़ाचा ठेका कसा दिला, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागणार आहे. ‘न खाने दुंगा’ असे म्हणणारे मोदी तिसऱ्याला खायला देऊन नंतर आपल्या ताटात ओढून घेत आहेत, राफेलची झालेली डिल ही अशीच चोरी आहे. मोदी देशाच्या सुरक्षेशी खेळत आहेत, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी आज, मंगळवारी नगरमध्ये मेळावा घेतला, मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. आंबेडकर यांनी दिवसभर थांबून धनगर, ख्रिश्चन, मुस्लिम समाजाचेही स्वतंत्रपणे छोटे मेळावे घेतले.

संभाजी भिडेमार्फत रा. स्व. संघाचा अजेंडा

संभाजी भिडे हे आरएसएसचाच अजेंडा चालवत आहेत, वारकरी भडकावेत, यासाठीच त्यांनी वारीत मनुवाद श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य केले. भाजप सत्ता मिळवण्यासाठीच भिडे यांचा फंडा वापरत आहे. वारकरी व वैष्णव धर्मीयांत दंगा घडवण्याचे भिडे व आरएसएसचे प्रयत्न आहेत. परंतु सरकार पाठीशी असल्याने भिडे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळेच भिडे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री जरी म्हणत असले की भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी करू, तरी ते भीमा-कोरेगाव प्रकरणाप्रमाणे याचीही तपासणी करणार नाहीत. मुख्यमंत्री व पंतप्रधानांना आलेली धमकी ही भाजपची नौटंकी आहे. या धमकीवरही काहीच कारवाई झालेली नाही, बचावासाठी विरोधी पक्षही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला तयार नाही, पंतप्रधानांच्या विरोधात बोलण्याचे धाडसही विरोधी पक्ष दाखवू शकत नाहीत.