प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : अकोला जिल्हा परिषदेचा बालेकिल्ला अबाधित राखण्यात भारिप-बहुजन महासंघाला यश आले. जिल्हा परिषदेवर गत दोन दशकांपासून सत्ता गाजवणाऱ्या भारिपने सलग पाचव्या निवडणुकीत एकहाती वर्चस्व मिळवले. जिल्हय़ातील ग्रामीण भागात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा करिश्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले. वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचे त्रांगडे निर्माण झाले असून, राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग वाशीममध्ये दृष्टिपथात आला आहे.

राज्यात भारिप-बहुजन महासंघाचा गड म्हणून अकोला जिल्हा परिषद ओळखली जाते. सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करून अ‍ॅड. आंबेडकरांनी दोन दशकांपूर्वी सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय डावपेचात आजही त्या प्रयोगाचा प्रभाव कायम आहे. जिल्हा परिषदेवरील मजबूत पकड अ‍ॅड. आंबेडकरांनी कधीही सैल होऊ दिली नाही. जिल्हय़ात लोकसभा, विधानसभा, महापालिका व नगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. सर्वत्र वर्चस्व प्रस्थापित करणारी भाजप केवळ जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून कायम दूर राहिली. जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजप नेत्यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, ग्रामीण भागातील भक्कम पाठबळाच्या आधारावर भारिपने भाजपसह शिवसेनेलाही धोबीपछाड दिला. जातीय समीकरण भारिपसाठी अनुकूल आहे. सामाजिक अभियांत्रिकीच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनी छोटय़ा-मोठय़ा जातींची मोट बांधून पक्षाच्या पाठीमागे मोठा जनाधार उभा केला. परिणामी, जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने यश मिळवले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या झेंडय़ाखाली लढवल्या तरी जिल्हा परिषद निवडणुकीत तांत्रिक अडचणीमुळे भारिप एबी फॉर्मवर लढविण्यात आल्या. विधानसभेत बाळापूरची एकमेव जागाही वंचित आघाडीला गमवावी लागली. सत्तेचे एकमेव केंद्र असलेले जिल्हा परिषद राखण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. आंबेडकरांपुढे होते. ते लीलया पेलत भारिप-बमसं पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमतापासून भारिप-बमसं थोडक्यात दूर राहिला. भारिपचे २३ सदस्य निवडून आले असून, अपक्षांमधील दोन सदस्य त्यांचेच बंडखोर आहेत. गेल्या वेळेस काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होऊन सभापती पद मिळवले होते. या वेळेसही काँग्रेस-राष्ट्रवादी भारिपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपला गेल्या वेळची ११ सदस्यसंख्याही कायम राखता आली नाही. भाजपला सात जागा मिळाल्या. शिवसेना गेल्या वेळच्या आठ जागांवरून १३ जागांवर पोहोचली. मतविभाजन टाळण्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढूनही त्यांची केवळ एक जागा वाढली. भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते शक्य वाटत नाही. भारिप-बमसं सत्तेसाठी कुठल्या पक्षाचा आधार घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचा अपेक्षाभंग

अकोला व वाशीम जिल्हय़ातील जिल्हा परिषद निवडणुका भाजपने मोठय़ा अपेक्षा ठेवून लढल्या. मात्र, भाजपला अपयशाचा सामना करावा लागला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जिल्हय़ांत सभा घेतलेल्या चारही ठिकाणी भाजपचा पराभव झाला. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह ग्रामीण भागातील भाजपच्या तीन आमदारांनी अकोला जिल्हा पिंजून काढत प्रचार केला; परंतु ग्रामीण जनतेने भाजपला नाकारले. मतविभाजनाचाही त्यांना फटका बसला. ग्रामीण भागातील पाळेमुळे घट्ट करण्यासाठी भाजपला आत्मचिंतन करावे लागेल. वाशीम जिल्हय़ात भाजपचे दोन आमदार असताना केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले.

वाशीममध्ये त्रिशंकू स्थिती

वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणूक आखाडय़ात सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सर्वाधिक १२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला. काँग्रेस नऊ, भारिप बहुजन महासंघ आठ, भाजप सात, माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या. स्वाभिमानी पक्षाने एक, तर तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. जागावाटपाच्या तिढय़ामुळे वाशीममध्ये निवडणुकीत महाविकास आघाडी जुळून येऊ शकली नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. मतविभाजनाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. गतवेळी १७ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. या वेळी काँग्रेसला आठ जागा गमवाव्या लागल्या. रिसोडमध्ये पाच व मालेगावात एक जागा जिंकून जनविकास आघाडीने काँग्रेसला धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, तर भाजपची एक जागा वाढली. भारिप-बमसंने आपले वर्चस्व वाढवत गतवेळेसच्या तुलनेत पाच जागा अधिक जिंकल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित आल्यास स्पष्ट बहुमताचा २७ चा जादूई आकडा गाठला जाऊ शकतो. सत्तास्थापनेसाठी राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग वाशीम जि.प.मध्ये आकारास येण्याची दाट शक्यता आहे. ऐन वेळी सत्तेचे एखादे नवे समीकरण जुळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.