News Flash

वारसदाराच्या भविष्यासाठी  माजी राष्ट्रपतींची ‘साखरपेरणी’?

प्रतिभाताई पाटील यांनी २२ ऑक्टोबरला भानखेडा मार्गावरील संत कंवरराम धाम येथे भेट दिली.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

विधानसभा निवडणुकीला अवधी असला तरी अमरावतीत आतापासूनच पडघम वाजू लागले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या दोन आठवडय़ांच्या अमरावती मुक्कामात अनेक हितचिंतकांच्या प्रत्यक्ष घरी भेटी देण्यामागे त्यांचे पुत्र माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या राजकीय भविष्याची ‘साखरपेरणी’ हे एक कारण असल्याची उघड चर्चा आता रंगली आहे. प्रतिभाताई पाटील यांनी दिवाळीच्या निमित्ताने गल्लोगल्ली फिरून अनेक परिचितांच्या घरी जाऊन त्यांना सुखद धक्का दिला.

अनेक ठिकाणी स्वत: रावसाहेब शेखावत उपस्थित होते.

प्रतिभाताई पाटील यांनी २२ ऑक्टोबरला भानखेडा मार्गावरील संत कंवरराम धाम येथे भेट दिली. या वेळी त्यांनी लंगरमध्ये महाप्रसादही घेतला. हा एक सार्वजनिक कार्यक्रम वगळता बारा दिवसांमध्ये हितचिंतकांच्या गाठी-भेटी घेणे यालाच प्राधान्य होते. महापालिकेतील स्वीकृत सदस्य अनिल माधोगढिया यांच्यासह अनेकांच्या घरी त्यांनी भेट दिली. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर प्रतिभाताईंचे शहरात आगमन झाले होते. एरवी, त्यांचा अमरावती भेटीचा कार्यक्रम आखीव रेखीव असतो, पण या वेळी त्यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज साधण्याची संधी अनेकांना मिळाली. आपल्या शहराला राष्ट्रपतिपद मिळणे ही त्या शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असते. प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्यावर अमरावतीकरांनी एकच आनंद व्यक्त केला होता. सर्वोच्च पदावर असतानादेखील शहराला अनेकदा भेटी देऊन अमरावतीवरील प्रेम कायम असल्याचा संदेश दिला होता. त्या राष्ट्रपती बनल्यावर अमरावतीचे राजकीय समीकरण मात्र एकदम बदलून गेले. तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याभोवती असलेला सत्तेचा लंबक एकदम दुसरीकडे कलला. मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी खेचून आणलेल्या एकात्मिक रस्ते विकास योजनेसह इतर अनेक विकासकामांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांना कुणी प्रतिस्पर्धी नाहीच, असे दावे केले जात असतानाच प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली होती. त्यांनाही आमदारकीचे वेध लागले होते. राष्ट्रपतीपुत्र म्हणून काँग्रेस नेतृत्वाचाही नाइलाज झाला होता. डॉ. सुनील देशमुख यांचे तिकीट कापून रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी नाकारल्याने डॉ. देशमुख भलतेच संतप्त झाले. पक्षनेतृत्वाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण डॉ. देशमुख हे हट्टाला पेटले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. राष्ट्रपतीपुत्र रिंगणात असल्याने अमरावतीच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. सर्वच राष्ट्रीय प्रसार माध्यमांना या निवडणुकीची दखल घ्यावी लागली होती. या निवडणुकीत मतदारांनी रावसाहेब यांच्या बाजूने कौल दिला आणि डॉ. देशमुख यांचा निसटता पराभव झाला.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी डॉ. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या उमेदवारीवर ते निवडूनही आले. रावसाहेब शेखावत यांचा पराभव मात्र जिल्ह्य़ाच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरला.

गेल्या साडेतीन वर्षांमध्ये रावसाहेब शेखावत हे राजकीयदृष्टय़ा फारसे सक्रिय नाहीत, अशी चर्चा शहरात सुरू झाली होती. विरोधी पक्षात असूनही त्यांचा आवाज नाही, पक्षसंघटनेत विस्कळीतपणा आला आहे, अशी काँग्रेसमधील शेखावत विरोधी गटाची तक्रार आहे. अशा स्थितीत प्रतिभाताई पाटील यांचा अमरावती दौरा वेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. रावसाहेब शेखावत यांच्यासाठी सोईस्कर राजकीय पाश्र्वभूमी तयार करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. प्रतिभाताई पाटील यांचा अमरावती दौरा हा त्याची सुरुवात होती, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

रावसाहेब शेखावत यांच्यासमोर आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून डॉ. सुनील देशमुख यांचे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा जनाधार दुरावला होता. तो जोडण्यासाठी प्रतिभाताई पाटील यांचा शब्द कामी येऊ शकतो, याच व्यूहरचनेतून या वेळी प्रतिभाताईंनी वैयक्तिक भेटींवर भर दिल्याचे सांगितले जाते.

रावसाहेबांसमोर सुनील देशमुख यांचे आव्हान

रावसाहेब शेखावत यांच्यासमोर आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून डॉ. सुनील देशमुख यांचे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा जनाधार दुरावला होता. तो जोडण्यासाठी प्रतिभाताई पाटील यांचा शब्द कामी येऊ शकतो, याच व्यूहरचनेतून या वेळी प्रतिभाताईंनी वैयक्तिक भेटींवर भर दिल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 2:09 am

Web Title: pratibha patil stay for two week in amravati
टॅग : Pratibha Patil
Next Stories
1 महालक्ष्मी मंदिर गाभाऱ्यातील सीसीटीव्हीवरून पुजारी आणि मंदिर समितीमध्ये वादावादी
2 यंत्रमाग उद्योजक मागे हटेनात, कामगार वाऱ्यावर
3 सांगलीत प्रस्थापितांना सावधतेचा इशारा!
Just Now!
X